दहावीत शिकणाऱ्या असजद बागवानची कमाल दृष्टिहीनासाठी बनवला सेन्सर चष्मा
X
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या असजद मुश्ताकन बागवा या विद्यार्थ्यांने कमाल केली असून दृष्टिहीन अंध व्यक्तींसाठी सेन्सर चष्मा बनवला आहे. यामुळे रस्त्याने अंध व्यक्ती चालत असताना काही अडथळे आले तर अंध व्यक्तीच्या हातात असणारी काठी सेन्सरच्या मदतीने चष्म्याला बसवलेल्या बुझरला संदेश देऊन त्याला वाजण्यास भाग पाडेल. त्यामुळे अंध व्यक्तीला पुढे काहीतरी अडथळा आल्याचे समजेल. त्याच्या या प्रयोगाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याची ही अनोखी काठी आणि चष्मा पाहण्यासाठी लोक त्याच्या घरी भेट देऊ लागले आहेत, प्रतिनिधी अशोक कांबळेंचा रिपोर्ट....
रस्त्याने चालताना दृष्टिहीन लोकांना विविध समस्याना तोंड द्यावे लागते
दृष्टीहीन लोकांना विविध समस्याना तोंड द्यावे लागते. त्यांना रस्त्याने चालताना समोर येणाऱ्या अडथळ्यांचे आकलन होत नसल्याने अंध व्यक्ती त्या अडथळ्यांना धडकल्या जाऊ शकतात. त्यांचा अपघात होऊन त्यांना इजा होऊ शकते. रस्ता पार करीत असताना ट्राफिकमध्ये त्यांचा अपघात होऊ शकतो. समोर आलेल्या अडथळ्यांचे आकलन न झाल्याने अंध व्यक्तींचे अपघात झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अंध व्यक्तींना बाहेर एकटे फिरणे मोठे जिकरीचे काम असते. त्यामुळे त्यांच्या सोबतीला सतत एखादी व्यक्ती असते. ती व्यक्ती समोर आलेल्या अडथळ्यांची माहिती अंध व्यक्तीला सातत्याने देत असते. त्यांना चांगल्या रस्त्याने घेऊन जाण्याचे काम करत राहते. या अंध व्यक्तींना रस्त्याने कसे चालायचे याबाबतचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था काही प्रमाणात कार्यरत आहेत. अंध अपंग व्यक्तीना शिक्षण देणाऱ्या शाळा सध्या उपलब्ध आहेत. त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम अनेक शाळा करत आहेत. त्यामुळे त्यांच्यात आज मोठे फेरबदल झाले असल्याचे पहायला मिळते. आज अनेक अंध अपंग व्यक्ती चांगल्या पगाराच्या नोकरीवर काम करत आहेत. या दृष्टीहीन लोकांत ज्ञानाची गंगा पोहचली असल्याचे दिसते. रस्त्याने जात असताना या अंध व्यक्तींच्या हातात एक काठी असते. त्या काठीच्या मदतीने त्या व्यक्तीना समोर आलेल्या अडथळ्यांचे आकलन करता येते.
आई-वडिलांनी असजदच्या संशोधक वृत्तीच्या कलागुणांना दिला वाव
असजद बागवान मोहोळ तालुक्यातील पेनूर या गावातील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षण घेत आहे. नुकतीच त्याची इयत्ता 10 ची परीक्षा संपली आहे. त्याला या प्रयोगासाठी त्याचे शिक्षक, मित्र,आई-वडील यांनी सहकार्य केले आहे. त्याच्या आई-वडिलांनी त्याच्या संशोधक वृत्तीच्या कलागुणांना वाव देऊन प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्याला साहित्य घरेदीसाठी पैसे देण्याचे काम केले आहे. असजदचे वडील मुश्ताक बागवान पेनूर येथील एसटी स्टँडवर ज्यूस विकण्याचे काम करतात. आई गृहिणी आहे. ज्यूस विकण्यासाठी असजद वडील मुश्ताक यांना कामात मदत करतो. ज्युसच्या धंद्यातून मिळणाऱ्या पैशातून कुटूंबाचा उदरनिर्वाह केला जतो. मुश्ताक यांचे कुटुंब मूळचे पंढरपूर तालुक्यातील करकंब या गावचे असून कामानिमित्त पेनूर या गावी स्थायिक झाले आहे. गेल्या 15 वर्षापासून असजदचे कुटुंब पेनूर गावात भाड्याच्या घरात राहत आहे.
सेन्सॉर काठी बनवण्याचा प्रयोग नवव्या प्रयत्नात यशस्वी
मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना असजद बागवान याने सांगितले की,सेन्सर काठी बनवण्याचा प्रयोग 6 महिन्यापासून सुरू होता, पण प्रयोग यशस्वी होत नव्हता. कमीत-कमी 7 ते 8 वेळा सेन्सॉर काठी बनवण्याचा प्रयोग अयशस्वी झाला होता. पण प्रयत्न सोडला नाही. नवव्या प्रयत्नात सेन्सॉर काठी बनवण्याचा प्रयोग यशस्वी झाला. ही सेन्सॉर काठी बनवण्याची कल्पना कशी सुचली, असे विचारताच त्याने सांगितले, की आमच्या शाळेत विज्ञान प्रदर्शन भरणार होते. त्यासाठी वडिलांना विचारले की, कोणता प्रयोग करू, त्यावेळेस त्यांनी सांगितले की, अंध व्यक्तीसाठी काही करता येत असेल तर बघ. हेच लक्षात ठेवून सेन्सॉर काठी व गॉगल बनवला. याचे साहित्य गोळा करत असताना यात 5 ते 6 महिन्याचा कालावधी गेला. त्यावर अभ्यास करून इंटरनेटच्या माध्यमातून साहित्याची नावे शोधून काढली आणि साहित्य खरेदी केले. यासाठी 4 हजार रुपयाच्या आसपास खर्च आला. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सॉर, मेमरी चिप, गॉगल, वायर, फायबर काठी, अलार्म देणारा बुझर यांचा समावेश होतो. ही काठी बनवण्यासाठी शाळेचे शिक्षक रियाज सर यांनी मार्गदर्शन केले.
सेन्सर काठीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अंध व्यक्तीला घेऊन काठीची केली टेस्ट
सेन्सर काठीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याची टेस्ट घेणे जरुरीचे होते. त्यासाठी गावातील एक अंध व्यक्तीची निवड करण्यात आली. अंध व्यक्तीच्या डोळ्यावर चष्मा घालून त्याच्या हातात सेन्सॉर काठी देण्यात आली आणि त्याला चालण्यास सांगण्यात आले. तो चालू लागल्यानंतर त्याच्या मार्गात आलेल्या अडथळ्यामुळे काठीच्या सेन्सॉरमुळे अलार्म वाजणारा बुझर वाजू लागला. त्यामुळे आपला सेन्सॉर काठीचा प्रयोग यशस्वी झाला असे समजले. येणाऱ्या काळात या काठीला आणखीन उत्तम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो लवकरच यशस्वी होईल.
टाकाऊ वस्तूंपासून बनवली काठी
असजद हा महात्मा गांधी विद्यालयात शिकतो. एक दृष्टिहीन व्यक्ती गावात काठीचा आधार घेत फिरत असताना ती एका विजेच्या खांबाला धडकली. हे असजदने पाहिले. अशा दृष्टिहीन व्यक्तींसाठी काहीतरी करावे, अशी भावना त्याने आपले वर्गशिक्षक रियाज मुजावर यांना बोलून दाखवली. त्यांचे मार्गदर्शन घेऊन टाकाऊ पाईपची स्टिक, लहान वायर, छोटा सेन्सर आणि अंधांसाठी असलेला काळा चष्मा यांचा वापर करून सेन्सर चष्मा तयार केला. त्यामुळे नेत्रहीन व्यक्ती चालताना समोर कुणी व्यक्ती, दगड, भिंत व विजेचा खांब असा कोणताही अडथळा आल्यास लगेच नेत्रहीन व्यक्तीला कळते. त्याची काठी कोणत्याही दिशेला वळवली तरी तिथे अडथळा असल्यास त्वरीत आवाज येतो. त्यामुळे नेत्रहीन व्यक्तीला मार्गातील अडथळा ओळखता येतो आणि तो पार करून पुढे जाता येते. सेन्सर चष्मा बनवण्यासाठी चष्मा 300 ते 400 रुपये, काठी 200 ते 300 रुपये, सेन्सर 500 ते 600 रुपये आणि वायर 50 ते 60 रुपये असा एकूण सुमारे एक ते दीड हजार रुपये खर्च आला आहे. भविष्यात दृष्टिहिनांसाठी यापेक्षा अधिक चांगला आणि कमी खर्चात चष्मा तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे असजद बागवान याने सांगितले.