Home > मॅक्स रिपोर्ट > शेतीचा नवा पॅटर्न : उसाकडून आद्रकाकडे

शेतीचा नवा पॅटर्न : उसाकडून आद्रकाकडे

ऊस आणि केळीला पाण्याची गरज मोठी.. त्यातच उत्पादन खर्च वाढला.. शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आणि सोलापूर जिल्ह्यातील कंदरमधील शेतकऱ्यांनी याच संकटातून नव्या आद्रक शेतीचा मार्ग शोधून काढला प्रतिनिधी अशोक कांबळे यांचा ग्राउंड रिपोर्ट....

शेतीचा नवा पॅटर्न : उसाकडून आद्रकाकडे
X

सोलापूर : जिल्ह्यात शेती क्षेत्रात पिकांचे वेगवेगळे प्रयोग होताना दिसत आहे. जिल्ह्यात ऊसाच्या ओलिताखाली मोठ्या प्रमाणावर क्षेत्र असून सुमारे 30 च्या आसपास साखर कारखाने आहेत.पण साखर कारखानदारी अडचणीत आली असल्याचे सांगितले जात आहे.शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यांना जाऊन ही त्यांना थकीत एफआरपीची रक्कम वेळेवर मिळत नसल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी ऊस सोडून दुसऱ्या पिकांच्या लागवडीकडे वळला असल्याचे दिसते.ऊसाला पाणी जास्त प्रमाणात लागते व उसामुळे शेती क्षेत्र सुमारे दीड वर्षे अडकून पडते. त्याच्यात दुसरे कोणतेही पीक घेता येत नाही.अपवादात्मक सुरुवातीचे काही महिने सोडले तर वर्षभर यात पीक घेता येत नाही.ऊस कारखान्याला जावूनही शेतकऱ्यांना पैसे वेळेवर मिळत नसल्याने पर्यायी पिकाचा लागवडीसाठी प्रयोग केला जात आहे आणि तो यशस्वी ही होत आहे.थकीत ऊसाची एफआरपी रक्कम मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने ही केली पण त्याचा परिणाम शेतकऱ्यांवर झाला असल्याचे दिसते.पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची शेतीसबंधीची विविध प्रकारची कामे खोळंबली आहेत.उसाचा पिकाला पर्यायी पीक म्हणून करमाळा तालुक्यातील कंदर येथील शेतकरी संतोष वागज यांनी आपल्या शेतात अद्रकच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.यातून त्यांना वर्षाकाठी चांगले उत्पादन मिळत आहे.ऊसाच्या बिलासारखे 5 ते 6 महिने त्यांना थांबावे लागत नाही.आद्रकचा माल विकला की लगेच पैसे मिळतात.आद्रकची शेती प्रामुख्याने सांगली,औरंगाबाद जिल्हात केली जाते.गेल्या 10 वर्षांपासून कंदर गावच्या परिसरातील शेतीत आद्रकचे उत्पादन घेत आहे.त्यातून चांगले पैसे मिळत आहेत.असे संतोष वागज यांनी सांगितले.

ऊस आणि केळी पिकाला आद्रकची पर्यायी शेती

करमाळा आणि माढा तालुक्याच्या सीमेवर उजनी धरण आहे.धरण माढा तालुक्यात जरी असले तरी धरणाच्या पाण्याने बराच भाग करमाळा तालुक्यातील व्यापला आहे.कंदर गाव करमाळा तालुक्यात असून जवळच उजनी धरण जलक्षेत्र आहे.त्यामुळे येथील शेती ही पूर्णपणे बागायती शेत आहे. येथे ऊस,केळी ही प्रमुख पिके घेतली जातात.पण गेल्या काही दिवसापासून उसामुळे शेतकरी अडचणी आला असल्याने तो शेतीत विविध प्रयोग करताना दिसत आहे.ऊस,केळी बरोबरच मका,द्राक्षे व आद्रक यांची शेती पाहायला मिळते.

वर्षभराच्या आत आद्रकचे उत्पादन

आद्रक या पिकाला जास्त पाणी चालत नाही.उष्ण कोरडे हवामान असलेल्या प्रदेशात हे पीक चांगल्या प्रकारे येते.यावेळी बोलताना शेतकरी संतोष वागज म्हणाले की,आद्रकची शेती म्हणजे ऊस आणि केळी पिकाला पर्यायी पीक आहे. आद्रक शेतकऱ्याला चांगले पैसे मिळवून देणारे पीक असून शेतकऱ्यांनी त्याची लागवड करणे आवश्यक आहे.हे पीक वर्षाच्या आत म्हणजे नऊ महिन्यात मार्केटला जाते.ऊस पिकाला पर्यायी पीक म्हणून या पिकांकडे वळलो.या पिकासाठी कोरडे हवामान आवश्यक आहे.जमीन दलदल नसावी.ती निचऱ्याची असावी.मी सातारा,औरंगाबाद, सांगली या भागामध्ये फिरून या शेतीविषयी माहिती घेतली व आपल्या शेतात आद्रकची लागवड करण्याचे ठरवले. त्यानुसार जमीन तयार केली.गेली 10 वर्षे आद्रकचे पीक घेत आहे.आद्रक पीक शेतकऱ्यांना वरदान ठरणारे आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाकडे वळायला काही हरकत नाही.





एक एकराच्या लागवडीसाठी एक टन आद्रक बियाणे

शेतात आद्रकची लागवड करायची असल्यास एका एकरात एक टन आद्रकचे बियाणे लागवडीसाठी लागते.आद्रकच्या बेण्याची किंमत मार्केटवर अवलंबून असते.याचे भाव कधी कमी तर कधी जास्त होतात.1 लाख रुपयांपासून ते 20 हजार रुपयांपर्यंत एक टन आद्रक बियाणे मिळते.आद्रकचे पीक जमिनीत येते.या झाडांची पाने नेहमी पिवळसर दिसतात.एखाद्या खुरट्या गवताप्रमाणे याची वाढ झालेली असते.

जास्त पावसाचा पिकावर काय परिणाम होतो?

या पिकावर वातावरणानुसार वरून करपा व खालून कुजवा रोगचा प्रादुर्भाव वाढू शकतो.मुख्यतः हे दोन रोग या पिकावर परिणाम करतात.खालून कंद कुजीसाठी वेळच्या वेळी पेस्टीज साइड,फंगीसाइड या पिकाला दयावेच लागते किंवा ते औषध ड्रीप मधून सोडावे लागते.या पिकावर अवकाळी पावसाचा म्हणावा तसा परिणाम होत नाही.पाऊस जास्त दिवस चालू राहिल्यास पिकांसाठी कंद सड सर्वात मोठा धोका आहे.असे शेतकरी वागज यांनी सांगितले.

आद्रकची लागवड मे ते जून दरम्यान

आद्रक या पिकाची लागवड 15 मे ते 15 जून च्या दरम्यान केली जाते.आद्रक पीक नऊ महिन्याच्या आत काढणीला येते.याच्या लागवडीसाठी एकरी सरासरी 1 लाख रुपयाच्या आसपास खर्च येतो.आद्रक नऊ महिन्यात पूर्ण परिपक्व होते.उन्हाळा सुरू होण्याचा आधी या पिकाच्या काढणीला सुरूवात होते.या पिकाला पाणी कमी लागते.या पिकाची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड केली जाते व फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात याची काढणी होती.असे शेतकरी संतोष वागज यांनी सांगितले.

एका एकरात दहा लाख रुपयांचे उत्पादन निघू शकते

मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना शेतकरी संतोष वागज यांनी सांगितले की, आद्रकचे उत्पादन एका एकरात 10 टनापासून 20 टनापर्यंत निघू शकते.आद्रकचे मार्केट फ्लेक्झिबल असून कधी 20 रुपये किलो तर कधी 150 रुपये किलो आद्रक मार्केटला विकली जाऊ शकते.सरासरी उतारा 15 टन 70 रुपये किलो पकडला तर 10 लाख रुपयांचे उत्पादन शेतकऱ्याला आद्रक मिळवून देवू शकते.काही वेळेस आद्रक पीक 2 लाख रुपयांचे सुद्धा आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकते.याचे भाव सतत कमी जास्त जात राहतात.आद्रकचे मार्केट लातूरला असून एका वेळेस 1 हजार टन माल मार्केटला नेल्यास तो लातूरच्या मार्केटमध्ये घेतला जातो. ऊस आणि केळी पिकाला आद्रक पीक पर्यायी पीक असून ते शेतकऱ्यांसाठी वरदानच म्हणावे लागेल असे शेतकरी संतोष वागज यांना वाटते.

Updated : 2 Feb 2022 9:31 PM IST
Next Story
Share it
Top