Home > मॅक्स रिपोर्ट > आराध्याला अखेर हृदय मिळाले!

आराध्याला अखेर हृदय मिळाले!

आराध्याला अखेर हृदय मिळाले!
X

आराध्या योगेशमुळे या चिमुरडीला अखेर हृदय मिळाले आहे. हृदयाचा आजार असलेल्या आराध्याचे हृद्य प्रत्यारोपण करणे हाच एकमेव पर्याय होता. त्यासाठी माय मेडिकल मंत्रा या आरोग्यविषयक वेबपोर्टलचे संतोष आंधळे, मयांक भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यापक मोहीम चालवली होती. मॅक्समहाराष्ट्रनेही या मोहिमेत त्यांची साथ दिली होती. अखेर या मोहिमेला यश आले आहे.

एप्रिल २०१६ला आराध्याला अचानक त्रास होऊ लागला होता. त्यानंतर डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत आराध्याचं हृदय फक्त १० टक्के काम करत होतं, असं आढळून आलं होतं. त्यामुळे तिच्यावर हृदय प्रत्यारोपण हा एकच पर्याय होता. तिला हृदय मिळावं यासाठी वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू होते.

आराध्याचे वडील योगेश मुळे ज्या दिवसाची गेले दीड वर्ष डोळ्यात तेल घालून दिवसरात्र वाट पाहत होते, तो दिवस अखेर सोमवारी उजाडला. गुजरातहून त्यांना फोन आला की “आराध्याला हवं असलेलं हृदय सूरतच्या एका रुग्णालयात मिळालं आहे.” हे ऐकताचं योगेश मुळेंचा आनंद गगनात मावेनासा झाला. सूरतवरून हृदय मुंबई आणण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर बनवण्यात आला. मंगळवारी आराध्यावर मुंबईच्या फोर्टिस रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात झाली.

सूरतच्या एका ब्रेनडेड झालेल्या १४ महिन्यांच्या बाळाच्या अवयवदानानंतर आराध्याला हृदय मिळालं. या बाळाला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर अवयवदानाबाबत कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. कुटुंबीयांनी परवानगी दिल्यानंतर अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण झाली.

माय मेडिकल मंत्राला प्रतिक्रिया देताना योगेश मुळे म्हणाले, “आराध्याला हृदयाचा आजार असल्याने डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपण हाच शेवटचा पर्याय असल्याचं सांगितलं होतं. गेले दीड वर्ष आम्ही सतत हृदयाच्या शोधात होतो. पण, अखेर बुधवारी तो फोन आला ज्याची मी गेले दीड वर्ष वाट पाहत होतो.”

गुजरातच्या डोनेल लाईफ या सामाजिक संघटनेचे कोऑर्डिनेटर निरव मंडेलवाला म्हणाले, “आम्ही सुद्धा गेले दीड वर्ष आराध्यासाठी हृदयाच्या शोधात होतो. खूप काळ प्रतिक्षेत राहिल्यानंतर आम्हाला १४ महिन्यांच्या बाळाचं हृदय मिळालं. हे बाळं ब्रेनडेड झालं होतं. या बाळाच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्यास परवानगी दिली, त्यानंतर अवयवदानाच्या प्रक्रियेला सुरूवात झाली.”

आराध्याला हृदय मिळाल्याबाबत माय मेडिकल मंत्राशी बोलताना राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन म्हणाले की, “आज माझ्यासाठी खूप मोठा दिवस आहे. आराध्याला हृदय मिळावं यासाठी सर्वांनी खूप प्रयत्न केले. मुख्यमंत्र्यांनी देखील आवाहन केलं होतं. अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश आलं.”

माय मेडिकल मंत्राचे संतोष आंधळे मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना म्हणाले की, "आमच्यासाठी हा मोठा आनंदाचा क्षण आहे. इतक्या दिवस केलेल्या प्रयत्नांचं चीज झाल्याचं समाधान आहे. अर्थात अवयवदानाच्या चळवळीतील हे एक छोटं पाऊल आहे. देशभरात अशा अनेक आराध्या आहेत, आणि अवयवदानाबाबत जर जागरूकता वाढली तर या अनेक आराध्यांना नवा जन्म मिळू शकतो."

https://youtu.be/LEAjpiSDnMo

Updated : 5 Sept 2017 4:03 PM IST
Next Story
Share it
Top