संभाजी राजे भाजप सोडणार? दिला सूचक इशारा
राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष सुरू आहे. त्यातच राष्ट्रपती नियुक्त खासदार संभाजी राजे यांनी कोल्हापुर उत्तरच्या मतदानावेळी सूचक इशारा दिला आहे.
X
संभाजी राजे यांच्या खासदारकीची मुदत येत्या ३ मे रोजी संपणार आहे. तर त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी मिळण्याची कमी शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान कोल्हापुर येथे मतदानावेळी संभाजी राजे यांनी ३ मे नंतर माझी दिशा वेगळी असणार आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे येत्या ३ मेनंतर संभाजी राजे भाजप सोडणार का? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Sambhaji raje leave BJP)
संभाजी राजे यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी मुंबईतील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण केले होते. (Sambhaji raje hunger strike) त्यानंतर संभाजी राजे यांच्या मागण्या मान्य झाल्याचे सांगण्यात आले असले तरी त्यावर कार्यवाही होण्याची शक्यता कमी असल्याचे मत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले होते. त्याबरोबरच गेल्या काही दिवसांपासून संभाजी राजे यांना पुन्हा राज्यसभेचे सदस्यत्व मिळणार का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे खासदार संभाजी राजे हे भाजपवर नाराज असल्याचे चित्र आहे. (sambhaji raje unhappy on BJP)
संभाजी राजे यांनी दिल्लीत संजय राऊत यांचीही भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी ही भेट वैयक्तिक कारणांमुळे आहे. या भेटीचा राजकीय अर्थ काढू नये, असे म्हटले होते. मात्र संभाजी राजे यांनी कोल्हापुर उत्तर विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करताना मी 30 सेकंद विचार करून मतदान केले. 3 मे रोजी माझ्या खासदारकीची मुदत संपणार आहे. त्यानंतर माझी भुमिका वेगळी असणार आहे. ती भुमिका 3 तारखेनंतर जाहीर केली जाईल, असे मत संभाजी राजे यांनी व्यक्त केले. त्यांनी कोल्हापुर येथे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत वक्तव्य केले. त्यामुळे संभाजी राजे भाजप सोडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (sambhaji raje will decide strategy after 3 may)
संभाजी राजे भाजप सोडण्याची शक्यता का आहे?
- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केंद्र किंवा राज्य सरकार विशेष प्रयत्न करत नसल्याबद्दल संभाजी राजे यांनी नाराजी व्यक्त केली होती.
- खासदार संभाजी राजे कोल्हापुर उत्तर विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान भाजपच्या व्यासपीठावर दिसले नाहीत. त्यामुळे त्यांना विचारात घेतले नसल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांकडून करण्यात येत आहे.
- गेल्या वर्षभरात संभाजी राजे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर, ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील विविध विचारधारेच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. त्यामुळे संभाजी राजे नवा पक्ष स्थापन करणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या चर्चा या फक्त चर्चा स्वरुपातच राहिल्या आहेत. मात्र येत्या 3 मेनंतर संभाजी राजे काय भुमिका घेणार हे कोडं उलगडणार आहे.