Home > Max Political > नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांना का हटवू शकले नाही?

नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांना का हटवू शकले नाही?

देशात भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री बदलले जात असताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना का हटवू शकले नाही. काय आहे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई, राजकीय विश्लेषक हेमंत देसाई, आणि राजकीय पत्रकार अशोक वानखेडे यांचं मत वाचा...

नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ यांना का हटवू शकले नाही?
X

गेल्या काही महिन्यांपासून भाजप शासित राज्यामध्ये मुख्यमंत्री बदलले जात आहेत. गेल्या पाच महिन्यातच भाजपने चार राज्यांमधील मुख्यमंत्री बदलले आहेत. या चार राज्यानंतर आता हिमाचलमध्ये देखील नेतृत्व बदल केला जाईल अशी चर्चा आहे. मात्र, ज्या उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात गंगा नदीच्या पाण्यावर मृतदेह तरंगले. या तरंगलेल्या मृतदेहामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशासह जगभरात प्रतिमा मलिन झाली. त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना भाजप का हटवू शकलं नाही. असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.



मध्यंतरी योगी आदित्यनाथ यांना हटवलं जाणार असंही वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर योगी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही झाली. या भेटीनंतर योगींवर मोदी नाराज असल्याच्या बातम्या आल्या. योगी यांनी अमित शहा यांच्यासह जे.पी. नड्डा यांची देखील भेट घेतली. या दरम्यान योगींना हटवण्यात येईल. असं बोललं जात असताना योगींनी दिलेल्या जाहिरातीवरून नरेंद्र मोदी यांचा फोटो गायब झाल्याचं देखील दिसून आलं. मोदी आणि योगी असा संघर्ष निर्माण झाल्याचं चित्रही समोर आलं. इतकं सगळं होऊन देखील भाजप नेतृत्व योगी आदित्यनाथ ला हटवू शकलं नाही. या संदर्भात आम्ही काही राजकीय विश्लेषकांची बातचीत केली.



या संदर्भात आम्ही ज्येष्ठ राजकीय विश्लेषक राजदीप सरदेसाई यांच्याशी बातचीत केली.



ते म्हणाले योगी यांची स्वत:ची लोकप्रियता आहे. उत्तर प्रदेशमध्ये सध्या तरी त्या लेव्हलचा कोणताही नेता नाही. मोदी यांच्यासाठी उत्तर प्रदेश महत्त्वाचं आहे. 2024 च्या दृष्टीकोनातून उत्तर प्रदेश सारख्या राज्याचं महत्त्व भाजप जाणतं. उत्तर प्रदेश शिवाय 2024 चं मोदींचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही.

योगी आणि नरेंद्र मोदी यांच्या दोघांमधील वादाबाबत विचारले असता, राजदीप सरदेसाई सांगतात. वाद हा राजकारणात असतो. अनेक नेत्यांमध्ये वाद आहेत. मात्र, या वादामुळं उत्तर प्रदेशमध्ये मोदी सत्ता गमावणार नाहीत. ते

practical politician आहेत. त्यांना योगींना हटवल्यानंतर पडणाऱ्या Negative Impact ची जाणीव असल्याचं राजदीप सरदेसाई यांनी सांगितलं आहे.

या संदर्भात आम्ही दिल्ली स्थित ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले



ते म्हणाले...

योगी मोदी पेक्षा वरचढ झाले आहेत. खरं तर योगी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री व्हावं अशी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची मुळीच इच्छा नव्हती. मोदी आणि अमित शहा उत्तर प्रदेश च्या मुख्यमंत्री पदी मनोज सिन्हा यांना पाठवणार होते. मात्र, संघांनी हस्तक्षेप केला. मोदी ज्या मनोज सिन्हा यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनवणार होते. ते मनोज सिन्हा सध्या जम्मू कश्मीर चे उपराज्यपाल म्हणून काम पाहत आहेत.

योगी आदित्यनाथ हे मोदी आणि अमित शहा यांची चॉइस कधीच नव्हते. ते संघाची चॉइस आहेत. जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री बनवण्याचा सवाल आला तेव्हा त्यांना खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यात आणलं गेलं. ते गोरखपूरहून भाजपचे खासदार होते.

योगी आणि मोदी यांचं कधीच पटलं नाही. योगी भाजपचे सिनिअर खासदार होते. तरीही मोदी यांनी त्यांना केंद्रीय मंत्रीमंडळात जागा दिली नाही.

मध्यंतरी योगी ज्या गोरखपूर मधून सातत्याने लोकसभेत आले आहेत. त्यांच्या मतदारसंघात भाजपने त्यांच्या अनेक समर्थकांना तिकिट दिली नव्हती. योगी आदित्यनाथ यांनी त्यांना त्यांच्या हिंदू युवा वाहिनीची तिकिट दिली होती. शेवटी संघाला हस्तक्षेप करावा लागला.

योगी आदित्यनाथ हे संघाच्या आदेशाने मुख्यमंत्री झाले आहेत. ते नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं ऐकत नाही.

2021 ला नरेंद्र मोदी यांना Intelligence ने उत्तर प्रदेशच्या परिस्थितीबाबत माहिती दिल्यानंतर मोदी यांनी त्यांच्या विश्वासातील अधिकारी अरविंद शर्मा यांनी उत्तर प्रदेशला पाठवण्याचा निर्णय घेतला. IAS असलेल्या अधिकाऱ्या मोदी यांनी व्हिआरएस घेण्यास सांगितलं. त्यांनी नोकरी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. मोदी आणि शहा यांना अरविंद शर्मा यांची उपमुख्यमंत्री पदी नेमणूक करून गृह खात्याचं मंत्री करायचं होतं. मात्र, योगी यांनी शर्मा यांना गृहमंत्री पद देण्यास नकार दिला.

अरविंद शर्मा हे सध्या उपाध्यक्ष आहेत. सध्या भाजपचे उत्तर प्रदेशमध्ये 17 उपाध्यक्ष आहेत. पुर्वी 16 होते. त्यामुळं या सर्व उदाहरणावरून योगी मोदी आणि शहा यांचं ऐकत नसल्याचं दिसून येतं.

भाजपने जर योगी यांना हटवलं तर योगी पुन्हा एकदा आपल्या गोरखनाथ गडातून आपला कारभार सुरु करतील. त्यांच्या हिंदू वाहिनीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवतील. त्याचा फटका भाजपला तर बसेलच त्याचबरोबर भाजप ज्या हिंदुत्वाचा सातत्त्याने उल्लेख करते. अशा हार्डकोअर हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या योगी यांना हटवलं तर भाजपला याचा मोठा फटका बसेल याची जाणीव भाजप नेतृत्वासह संघाला आहे. त्यामुळं योगी आदित्यनाथ यांना मोदी, शहा हटवू शकत नाही. असं मत अशोक वानखेडे यांनी व्यक्त केलं आहे.

या संदर्भात आम्ही राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्याशी बातचीत केली.



ते म्हणाले सध्या उत्तर प्रदेशमध्ये योगी शिवाय भाजपला पर्याय नाही. उत्तर प्रदेश राज्य मोठं आहे. त्यांना हटवलं तर निवडणुकीचं गणित चुकू शकतं. विधानसभा निवडणुकांबरोबरच लोकसभेतही भाजपला फटका बसू शकतो. मोदी यांनी त्यांचा माणूस योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळात देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, योगी यांनी माजी सनदी अधिकारी अरविंद शर्मा यांना मंत्रीमंडळात स्थान दिलं नाही. हे आपण सर्वांनी पाहिलं आहे.

तसंच योगी यांच्या विरुद्ध पक्षाअंतर्गत असं बंड झालेलं नाही. तसंच योगी यांना हटवलं तर जातींचं समीकरण बिघडू शकतं. त्यामुळं हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या योगी यांना हटवणं मोदी शहा यांना कठीण झालं आहे. त्याचबरोबर योगी यांनी ज्या पद्धतीने राम मंदीराच्या निर्माणा संदर्भात कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याचा विचार करता योगी यांच्याकडे हिंदुत्वाचा नवा चेहरा म्हणून पाहिलं जात आहे.

गावांची नाव बदलणं, गोहत्या बाबत घेतलेला स्टॅड यामुळे ते हार्डकोअर हिंदू पॉलिटिसीएन म्हणून समोर येत आहेत. भविष्यात मोदींना योगी चॅलेंज ठरतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळं योगी यांना मोदी हटवू शकले नाही. असं मत हेमंत देसाई यांनी व्यक्त केलं आहे.

एकंदरीतच सर्व राजकीय विश्लेषकांचं विश्लेषण पाहिलं असता सर्व ज्येष्ठ राजकीय विश्लेषकांच्या मते योगी आदित्यनाथ हे हिंदुत्वाचा हार्डकोअर चेहरा असल्याने तसंच योगी यांना उत्तर प्रदेशमध्ये पर्याय नसल्यानं भाजपचं केंद्रीय नेतृत्व त्यांना हटवू शकत नाही असं मत सर्व राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे.

Updated : 19 Sept 2021 10:51 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top