वादाऐवजी संवादावर भर देतो तो खरा नेता, मुख्यमंत्र्यांचा फडणवीस यांना टोला?
X
कोल्हापूर- राज्यात एकीकडे ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा वाद पेटलेला आहे. भाजपने या दोन्ही मुद्द्यांवर सरकारची कोंडी करण्याचे आक्रमक प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केले आहे. संघर्ष करीत असताना संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी करायचा हे ज्याला कळते आणि जो वादाऐवजी संवादावर भर देतो आणि समाजाचं चोहोबाजुनी रक्षण करतो तोच खरा नेता होवू शकतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
राजर्षी शाहू महाराज जयंती दिनानिमित्त कोल्हापूर येथे सुरु करण्यात आलेल्या पहिल्या छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव संस्थेच्या (सारथी) उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले त्यावेळी ते बोलत होते.
संभाजीराजेंचे मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न खासदार संभाजीराजेने संयमाने हातळल्याबद्दल राजेंना धन्यवाद. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. सरकार म्हणून जे जे करता येणे शक्य आहे ते सर्व करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. आरक्षणाच्या अनुषंगाने कायद्याची लढाई शासनाने सोडली नसल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, दिन दुबळ्यांना ताकद देण्याचे काम महाविकास आघाडी शासन करीत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मराठा समाजाला न्याय देण्याची शासनाची भूमिका असून समाजाच्या इतर मागण्याबाबतही सरकार संवेदनशील आहे.
तत्पूर्वी खासदार संभाजीराजेंनी राज्यातील पहिले उपकेंद्र कोल्हापूरात सुरु केल्याबद्दल सरकारचे आभार मानुन या उपकेंद्रसाठी शासनाने किमान 5 एकरापेक्षा अधिक जमीन द्यावी अशी मागणी केली. तर अध्यक्षीय भाषणात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, या उपकेंद्राच्या माध्यमातून समाजाला मार्गदर्शन मिळेल. शासनाने समाजाच्या इतर प्रश्नांबाबतही लवकरात लवकर निर्णय घेवून समाजाला न्याय देण्याचे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.