फोन टॅपिंग व ब्लॅकमेलिंगसाठी IPS रश्मी शुक्लांचा वापर कुणी केला? नाना पटोले
X
पोलीस अधिकाऱ्यांचा राजकीय फायद्यासाठी वापर करुन विरोधी पक्षाच्या लोकांवर कारवाई करण्याचे पाप देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सुरु झाले. वरिष्ठ पोलिस अधिकारी रश्मी शुक्ला यांना हाताशी धरून राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग केले हे सिद्ध झाले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे परंतु त्यांना टॅपिंगचे कुणी आदेश दिले होते हे उघड होण्यासाठी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करत बॉम्बस्फोटातील आरोपी ईक्बाल मिर्चीच्या पैशावर पक्ष चालवणारे कोण आहेत? त्यांची चौकशी करून त्यांच्यावरही कारवई करा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
विधानसभेतील चर्चेत भाग घेत नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र हे पुरोगामी व कायद्याचे राज्य आहे. राज्यात गुन्हेगारी प्रवृतीला थारा दिला जाऊ नये अशीच सर्वांची भूमिका आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार पोलिसांचा वापर करत असल्याचा आरोप केला परंतु माझ्यासह अनेक राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग करण्याचे काम कोणत्या सरकारमध्ये झाले हे स्पष्ट झाले असून गुन्हाही नोंदला गेला आहे. पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा वापर कुणी केला व कशासाठी केला हे महाराष्ट्राला कळले पाहिजे यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. सरकारने चौकशी करून अहवाल सादर केला पाहिजे. बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध ठेवणे चुकीचे आहे, इक्बाल मिर्ची या बॉम्बस्फोटातील आरोपीची देणगी कोणत्या पक्षाला मिळाली? कुख्यात गुंड ज्याचा बॉम्बस्फोटात सहभाग होता त्याचा पैसा कसा चालतो? त्याची चौकशी झाली पाहिजे व ज्या पक्षाने तो पैसे वापरला त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. फडणवीस सरकारच्या काळापासून सुरु झालेली गुन्हेगारी थांबली पाहिजे.
भीमा कोरेगावचे प्रकरण राज्यात झाले. शौर्य स्तंभावर लाखो लोक नमन करायला जातात पण त्यादिवशी दुकाने बंद करण्यात आली होती, पिण्याच्या पाण्याची सोयही केलेली नव्हती. त्यानंतर राज्यात दंगली झाल्या. ह्या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडे होते मग पहाटेचे सरकार आले त्यावेळी हे प्रकरण केंद्र सरकारच्या एनआयकडे का दिले गेले त्याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे. राज्यात गुन्हेगारी प्रवृत्ती कुठुन सुरु झाली ह्याच्या मुळाशी गेले पाहिजे. गुन्हेगारी वाढू नये हिच सर्वांची इच्छा आहे. माझी मागणी आहे की भीमा कोरेगाव प्रकणानंतर राज्यात दंगली उसळल्या, दलित समाजाच्यातील लोकांवर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागे घ्यावेत.
मुंबई सहकारी बँकेच्या माध्यमातून लुटण्याचे काम केले ते लोकही पदावर आहेत. त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. मुंबई सहकारी बँकेतील घोटाळ्याबाजांवर कारवाई झाली पाहिजे. कायदा सर्वांना सारखा असला पाहिजे अशी मागणीही पटोले यांनी केली.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्दा उपस्थित करत नाना पटोले म्हणाले की, २०१७ साली ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुरु झाला. ज्या जिल्हा परिषदांमध्ये हा प्रश्न होता त्या जिल्हा परिषदांवर प्रशासक बसवला गेला पण नागपूर जिल्हा परिषद दोन वर्ष कशी चालली. त्यावेळी फडणवीस यांचेच सरकार होते. ओबीसी आरक्षण प्रश्नी आयोग बसवून ट्रिपल टेस्ट करा असे निर्देश कोर्टाने दिले होते मग भाजप सरकारने त्यावर निर्णय का घेतला नाही. ओबीसी समाजाचा हा प्रश्न या समाजाचा फुटबाल करु नका, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे, असेही पटोले म्हणाले.