Women Reservation मध्ये SC, ST महिलांचं स्थान काय असेल ?
X
लोकसभेत बहुप्रतिक्षित महिला आरक्षण विधेयक आज मंजूर झालं. चिठ्ठीद्वारे मतदान घेण्यात आलं. त्यात विधेयकाच्या बाजूनं ४५४ तर विरोधात २ जणांनी मतदान केलं. एकूण ४५६ सदस्यांनी मतदान केलं होतं.
या विधेयकात संसद आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आलीय. महिला आरक्षणासाठी राज्यघटनेत १२८ वे संशोधन करणारं हे विधेयक आहे.
हा कायदा लागू करण्यासाठी हे विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमतानं मंजूर करावं लागणार होतं. त्यातली पहिली पायरी म्हणजे लोकसभेत हे विधेयक प्रचंड बहुमतानं मंजूर करण्यात आलं. त्यानंतर २१ सप्टेंबरला हे विधेयक राज्यसभेत मतदानासाठी ठेवलं जाणार आहे.
महिला आरक्षण लागू झाल्यानंतर लोकसभा आणि विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना केली जाणार आहे. त्यात लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची हद्द ठरवली जाणार आहे. विधेयकानुसार लोकसभा, राज्यसभा त्याचबरोबर विविध राज्यांच्या विधानसभा आणि नवी दिल्ली विधानसभेतही एक तृतीयांश जागा या महिलांसाठी राखीव होतील. याचाच अर्थ लोकसभेतील एकूण ५४३ जागांपैकी १८१ जागा या महिलांसाठी आरक्षित होतील.
लोकसभा आणि राज्यातील विधानसभेमध्ये अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) च्या उमेदवारांसाठी जागा राखीव आहेत. याच राखीव जागांमधून एक तृतीयांश जागा आता महिलांसाठी आरक्षित केल्या जाणार आहेत.
विद्यमान लोकसभेत १३१ जागा या एससी-एसटी च्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. महिला आऱक्षणाच्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर या १३१ जागांपैकी ४३ जागा या महिलांसाठी राखीव होतील. याचाच अर्थ असा की, महिलांसाठीच्या राखीव १८१ जागांपैकी १३८ जागांवर कुठल्याही जातीची महिला उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकते, म्हणजेच या जागांवर पुरूष उमेदवारांना संधी मिळणार नाही.