Gujarat Election: हार्दिक पटेल नंतर कॉंग्रेस चा प्लान काय?
गुजरात निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हार्दिक पटेलने काँग्रेस पक्ष सोडल्याने हार्दिक पटेलनंतर काँग्रेसचा काय प्लॅन असणार आहे? याची चर्चा सुरू झाली आहे.
X
गुजरात विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेस राम राम ठोकल्यानं काँग्रेस आता नवीन रणनिती आखत आहे. काँग्रेसने आता नरेश पटेल यांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला आहे.कॉंग्रेस प्रदेश प्रभारी रघू शर्मा यांनी नुकतीच नरेश पटेल यांची भेट घेतली. त्यांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. मात्र, नरेश पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का? हे अद्यापपर्यंत समोर आलेले नाही.मात्र, काँग्रेस नरेश पटेल यांना विजयाचा चावी मानत आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या उदयपूर चिंतन शिबिरानंतर गुजरातमध्ये कोणतेही नवीन बदल झालेले दिसून येत नाहीत. मात्र, पक्षाच्या मागील कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी पक्षाने अमित चावडा, माजी विरोधी पक्षनेते परेश धनानी यांच्यासह सात सदस्यीय समितीची स्थापन केली आहे.
गुजरात मधील आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेस ओबीसी, दलित, पाटीदार आणि अल्पसंख्याक या समाजाला सोबत घेऊन बाजी मारण्याच्या तयारीत असल्याच दिसुन येत आहे. काँग्रेसची ही रणनीती माजी मुख्यमंत्री माधवसिंह सोलंकी यांच्या खाम (क्षत्रिय, दलित, आदिवासी आणि मुस्लिम) थेअरी प्रमाणेच आहे.
काय आहे ही थेअरी?
या थेअरीनुसार 1985 मध्ये काँग्रेसने 149 जागांवर विजय मिळवला होता.
कॉंग्रेस ला सोडचिठ्ठी दिलेल्या हार्दिक पटेल यांना असं वाटत नाही. त्यांच्या मते, 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीमुळे काँग्रेस ला मोठा विजय मिळाला होता. दरम्यान, पाटीदार आंदोलनातील हार्दिक पटेल यांचे सोबती आणि नरेश पटेल यांचे निकटवर्तीय दिनेश बामानिया यांनी, नरेश पटेल हे काँग्रेसमधूनच राजकारणात एंट्री करतील, अन्यथा ते राजकारणापासून दूर राहतील. अशी माहिती दिली आहे.
काँग्रेसने उदयपूर चिंतन शिबिरानंतर एक समिती स्थापन केली आहे, जी पक्षाच्या मागील कार्यक्रमांचा आढावा अहवाल तयार करेल. या अहवालाच्या आधारे आमदार आणि पदाधिकाऱ्यांमध्ये कोण सक्रिय आहे आणि कोण नाही, हे पाहुनच पक्षाचं तिकीट दिलं जाणार आहे.
प्रभारी डॉ.रघु शर्मा सांगतात की, चिंतन शिबिराचे निर्णय गुजरातमध्ये लवकरच लागू केले जातील. काँग्रेसमध्ये मोठा बदल होणार आहे. तसेच, नरेश पटेल यांच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, पक्षात प्रवेश घ्यायचा की नाही हे त्यांनी ठरवायचं यापूर्वी त्यांनी काँग्रेस हायकमांडचा प्रस्ताव नरेश पटेल यांच्या समोर मांडला होता, ज्यामध्ये त्यांना निवडणूक प्रचाराचा चेहरा बनवले जाण्याची शक्यता आहे.