उद्या होणार विदर्भातील ५ मतदारसंघात मतदान...! वाचा सविस्तर बातमी.
महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान हे १९ एप्रिल रोजी विदर्भातील ५ मतदारसंघात होणार आहे.
X
निवडणूक आयोगाकडून एक महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आणि देशभरात विविध पक्षांच्या प्रचाराला वेग आला. उमेदवारांची नावं जाहीर करणे, प्रचारसभा, मिरवणुक आणि शेवटी उमेदवारी अर्ज दाखल करणे. ही सगळी रणधुमाळी बघत बघत आपण निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यापर्यंत कधी येऊन पोहोचलो कळलंच नाही. अखेर उद्या(१९ एप्रिल) रोजी देशभरातील लोकसभा निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील विदर्भ भागातल्या पाच मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये प्रामुख्याने रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघात मतदान होणार आहे.
कुठल्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार आहे आणि त्याविरुध्द कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे यांचा संपूर्ण आढावा या बातमीत घेतला आहे.
१) नागपूर लोकसभा मतदारसंघ :
नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपकडून(महायुतीकडून) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे यांची थेट लढत असणार आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून काँग्रेसच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
२) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ :
चंद्रपूर लोकसभेची राजकीय लढत सुध्दा विशेष लक्षवेधी होणार असून तब्बल १५ उमेदवार याठिकाणी मैदानात उतरले आहेत. तर भाजपकडून मत्री सुधीर मुनगंटीवार हे उमेदवार आहेत आणि त्यांच्याविरोधात काँग्रेस नेत्या प्रतिभा धानोरकर या रिंगणात उतरल्या आहेत. तर वंचित बहुजन आघाडी चे राजेश बेले हे सुध्दा रिंगणात उतरले आहेत.
३) गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ :
गडचिरोलीतून सुध्दा भाजप विरूध्द काँग्रेस अशीच लढत असणार असून यामध्ये भाजपचे उमेदवार उमेदवार आशोक नेते विरूध्द काँग्रेस नेते डॉ. नामदेव किरसान असा सामना रंगणार आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघातील सहा विधानसभेतील एकंदरीत वातावरण बघता महायुतीचे अशोक नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्यात थेट लढत होणार आहे तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हितेश मडावी हे सुध्दा जोरदार तयारीने मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ही राजकीय लढत विशेष ठरणार आहे.
४) रामटेक लोकसभा मतदारसंघ :
रामटेकची लढत सुद्धा लक्षवेधी ठरणार आहे. काँग्रेस आमदार राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात(महायुती) प्रवेश करत लोकसभेची उमेदवारी मिळवली आहे. शिंदे गटात सामील झालेल्या विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांची उमेदवारी कट करून राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसकडून श्यामकुमार बर्वे रिंगणात आहेत. या मतदारसंघातून काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याने त्या अडचणीत सापडल्या होत्या. अखेर त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली. तर रामटेक मधून वंचित बहुजन आघाडीकडून शंकर चहांदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेकची ही तिरंगी लढत लक्षवेधी ठरणार असून सगळ्याचं याकडे लक्ष लागलं आहे.
५) भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ :
भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी 18 उमेदवार एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. भाजपकडून (महायुती) सुनील मेंढे हे उमेदवार आहेत तर काँग्रेसकडून(महाविकास आघाडी) डॉ. प्रशांत पडोळे तसेच वंचित आघाडीकडून संजय गजानन केवत या तिघांमध्ये थेट लढत होत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
महाराष्ट्रात ५ टप्प्यात होणाऱ्या मतदानाचे वेळापत्रक :
महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिल रोजी होणार असून शेवटच्या अर्थात पाचव्या टप्प्यातील मतदान हे २० मे रोजी होणार आहे. याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे-
१) पहिला टप्पा : १९ एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर.
२) दुसरा टप्पा : २६ एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी.
३) तिसरा टप्पा : 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले.
४) चौथा टप्पा : 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड.
५) पाचवा टप्पा : 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे.