लखीमपूर खेरी: केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्राचा मुलगा आशिष मिश्राला अखेर अटक
Union Minister's son Ashish Mishra arrested in Lakhimpur Kheri violence case
X
आज केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राला अखेर लखीमपूर खेरी घटनेत अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवार 9 ऑक्टोबरला अनेक तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली आहे. सकाळी 11 पासून चाललेल्या चौकशी दरम्यान, त्याला सुमारे 40 प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी बर्याच प्रश्नांची उत्तरे दिली, परंतु घटनेच्या दिवशी म्हणजेच रविवारी दुपारी 2.36 ते दुपारी 3.30 पर्यंत ते कुठे होते आणि काय करत होते? याबद्दल कोणतंही समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नाहीत.
म्हणून त्यांना अटक करण्यात आली आहे.
'सहकार्य करत नाही'
आशिष मिश्राची चौकशी करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आशिष तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगितले. तपासात सहकार्य न केल्यानं त्याला अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी माध्यमांना सांगितलं आहे. आशिषला रविवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिस आशिष मिश्राची कोठडी मागणार असल्याचे समजते. जेणेकरून त्याची पुढील चौकशी करण्यात येईल आणि तपास पुढे जाऊ शकेल.
अजय मिश्रा राजीनामा देणार का?
या अटकेमुळे आशिषचे वडील केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा आपल्या पदाचा राजीनामा देणार का असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. जर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:हून अजय मिश्रा यांचा राजीनामा घेतात का किंवा त्यांना बडतर्फ केलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे..
दरम्यान या घटनेनंतर अजय मिश्रा दिल्लीला गेले, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांच्या कार्यालयात जाऊन सामान्यपणे काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला माध्यमांमध्ये बातम्या होत्या की अजय मिश्रा राजीनामा देणार नाहीत. पण आता मुलाच्या अटकेनंतर मंत्र्यावर दबाव वाढला आहे.
काय आहे प्रकरण?
रविवार, 3 ऑक्टोबर ला लखीमपूर-खेरी येथे, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य लखीमपूर-खेरी येथील काही प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार होते. त्यानंतर त्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचे मूळ गाव बनबीरपूरला जायचे होते. उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाची माहिती मिळताच शेतकरी नेते काळे झेंडे दाखवण्यासाठी अजयकुमार मिश्रा यांच्या गावात पोहोचले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांवर गाडी घातली. या अपघातात अनेक शेतकरी जखमी झाले. तर काहींचा मृत्यू झाला आहे. या घटनेने देशभरात संतापाची लाट आहे.