सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंचा हवाला ऑपरेटर एकच, किरीट सोमय्या यांचा आरोप
X
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांवर दररोज नवनवीन आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांनी आता आणखी एक गंभीर आपरोप केला आहे. दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांना महाविकास आघाडीतील १२ जणांवर कारवाई होणार असल्याचा दावा केला, त्यातील १० नावं गुरूवारी जाहीर करण्यात आली होती, तर २ नावांची घोषणा त्यांनी या पत्रकार परिषदेत केली. मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष, शिवसेनेचे नेते यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव आणि महापौर किशोरी पेडणेकर यांचे भ्रष्टाचार सिद्ध झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.
तसेच यावेळी किरीट सोमय्या यांनी गांधी-ठाकरे परिवारावर गंभीर आरोपही केले. उद्धव ठाकरे यांचा परिवारही मनी लाँडरिंगमध्ये अडकला असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केला, पण यामध्ये त्यांनी १९ बंगले लपवले असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. तर शेल कंपन्यांच्या माध्यमातून यशवंत जाधव यांनी १५ कोटी रुपये कमावले, असा आरोपही त्यांनी केला. एवढेच नाही तर उद्धव ठाकरे आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा उदय शंकर महावार हा एकच हवाला ऑपरेटर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
तसेच आता कोर्लइ येथील १९ बंगल्यांच्या प्रकरणात येत्या काही दिवसात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार असल्याची माहितीही किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली.