उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली: अमित शाह मुंबईत कडाडले
केवळ दोन जागांसाठी उध्दव ठाकरेंनी २०१४ मध्ये युती मोडली. त्यानंतर मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप पदाका-यांसोबत बोलताना केला.
X
मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केलं विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं लक्ष्य १५० जागा जिंकण्याचं असेल अशी घोषणा केली.
मुंबईच्या दौऱ्यावर असणाऱ्या शाह यांनी कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा थेट उल्लेख करत त्यांनी आपल्याला धोका दिला. केवळ दोन जागांसाठी त्यांनी २०१४ मध्ये युती मोडली असं सांगतानाच मोदी आणि फडणवीसांच्या नावाने मतं मागून जिंकून आल्यानंतर आमच्याशी विश्वासघात केल्याचा आरोप शाह यांनी केला. उद्धव ठाकरेंना आता जमीन दाखवण्याची वेळ आली आहे असं म्हणत अमित शाह यांनी देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उधळला.
जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा झालीच पाहिजे. भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने जमीनीवर उतरुन काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा शाह यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर केलेल्या भाषणात व्यक्त केली. तसेच पुढे बोलताना अमित शाह यांनी थेट उद्धव ठाकरेंचा उल्लेखही केला. उद्धव ठाकरेंनी केवळ दोन जागांसाठी २०१४ मध्ये आपल्यासोबतची युती तोडली असं शाह म्हणाले. ते खयाली पुलाव पकवत होते. त्यांना वाटलेलं भाजपा युती तोडणार नाही. आपल्याशिवाय भाजपाचं काय होणार. आपल्याच जास्त जागा जिंकून येतील असा त्यांचा समज होता. जो चुकीचा ठरला, असंही शाह यांनी भाषणामध्ये म्हटलं.
राजकारणात काहीही सहन करा, पण धोका नाही असा थेट संदेश अमित शाह यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला. जे धोका देतात त्यांना योग्य शिक्षा दिली पाहिजे आणि यासाठी कार्यकर्त्यांनी मैदानात उतरलं पाहिजे असंही शाह म्हणाले. महाराष्ट्रातलं हिंदुविरोधी राजकारणं आपल्याला संपवायचं आहे, असंही अमित शाह यांनी आपल्या भाषणात म्हटलं. मोदी, फडणवीसांच्या नावाने मतं मागून तुम्ही जिंकलात आणि विश्वासघात केला. तुमचा पक्ष आज छोटा झाला यासाठी तुम्हीच जबाबदार आहात, असंही शाह यांनी उद्धव ठाकरेंना ऐकून दाखवलं आहे.