पहिली सर्जिकल स्ट्राइक शिवाजी महाराजांनी केली शरद पवारांचा मोदींना टोला
X
आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने गौरविण्यात आले. शरद पवार (Sharad pawar ) यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आपल्या भाषणात शरद पवारांनी मोदींना टोलाही लगावलाय.
शरद पवार म्हणाले, "केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकमान्य टिळक यांनी इंग्रजांना घाम फोडला होता. सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती यामध्ये टिळक यांचं मोठ योगदान आहे. अलिकडच्या काळात या देशाच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. परंतु देशातील पहिली सर्जिकल स्ट्राइक शिवाजी महाराजांच्या काळात झाली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालात शाहिस्तेखानाची बोटे कापली होती, असे शरद पवार यांनी म्हटले. यावेळी त्यांनी मोदी यांच्या कामगिरीचे कौतूकही केले.
मात्र, आपल्या संपूर्ण भाषणात शरद पवार यांचा मुख्य रोख छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांनी देशासाठी दिलेल्या योगदानावरच राहिला. भाषणाच्या शेवटी शरद पवार यांनी केवळ एका ओळीत नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत त्यांचे अभिनंदन केले. यापलीकडे शरद पवार मोदींविषयी फारसे बोलले नाहीत.