Home > Max Political > राज्यातील दंगलीचा एकच पॅटर्न: तुषार गायकवाड

राज्यातील दंगलीचा एकच पॅटर्न: तुषार गायकवाड

भीमा-कोरेगाव, अमरावती, कोल्हापूर आणि आमच्या सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी इथे घडलेले हिंसाचाराचे प्रकार या सर्व घटनांमध्ये एकच पॅटर्न दिसतो. तो म्हणजे बाहेरच्या लोकांना घुसवून स्थानिकांच्या मदतीने हिंसाचार घडवून आणला गेला आहे, लेखक तुषार गायकवाड यांचे परखड विश्लेषण...

राज्यातील दंगलीचा एकच पॅटर्न: तुषार गायकवाड
X


राज्यातील इतरही जिल्ह्यात असेच प्रकार घडलेले आहेत. गेल्या ७ वर्षांतील देशभरातील अशा घटनांचे अवलोकन केले तर सर्वच ठिकाणचा पॅटर्न सेम दिसतो. दंगल कधीच आपसूक घडत नाही. दंगल घडवून आणली जाते. त्यावर कायदेशीर कारवाई करणे राज्य सरकारची जबाबदारी आहे.

प्रत्येक ठिकाणच्या दंगलीचे खापर स्थानिक लोक सत्ताधारी सरकारशी संबंधित राजकीय नेते व राजकीय धर्मांध संघटनेच्या नेतृत्वावर फोडतात. दंगलीची हि एक अत्यंत महत्त्वाची बाजू आहे! यासोबतच दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे.

दुसरी बाजू म्हणजे, जगभरात ज्या धर्माचे लोक बहुसंख्य आहेत तिकडे अल्पसंख्याक धर्माच्या लोकांना लक्ष्य करण्याचे प्रकार घडतातच. अशा परिस्थितीत राज्यात अल्पसंख्याक असलेल्या धर्माची मुले सातत्याने हिंदू देवदेवता, महापुरुष यांच्या बाबतीत आक्षेपार्ह मजकूर सोशल मेडीयावर का प्रसिध्द करतात?

कधीतरी या बाजूचा विचार होणार आहे का? या बेरोजगार युवकांना अशी समाजविघातक कृत्ये करण्यासाठी कोण उद्युक्त करते?

पालक म्हणून केवळ महागडा मोबाईल, ५ जी इंटरनेट कनेक्शन, लॅपटॉप देवून आपली जबाबदारी संपत नाही. आपली मुलं सोशल मेडीयावर काय करतात? यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. 'आम्हाला त्यातलं काय कळतंय?' म्हणून हात झटकून चालणार नाही. दुर्लक्ष केल्यास पुढचा नंबर आपला असू शकतो. याचे भान प्रत्येक पालकाने राखले पाहिजे.

दंगली घडवून आणणाऱ्या राजकारणी टाळक्यांची मुलं शहरातील उच्च दर्जाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतात. पुढील शिक्षण पुणे मुंबईत करुन परदेशात जाऊन डिग्री मिळवतात. त्यानंतर तिकडेच सेटल होतात. किंवा परत येवून बापाची गादी चालवतात.

हे गणित जोवर प्रत्येक घरात नीट समजणार नाही. तोवर धार्मिक दंगली आणि सामान्य कुटुंबातील बळी जातच राहणार हे वास्तव आहे.

-- तुषार गायकवाड


Updated : 13 Sept 2023 9:31 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top