'युपीए' नावाची संघटना पण प्रबळ विरोधी पक्ष नाही, सामनामधून काँग्रेसला चिमटे
X
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी झालेल्या काही विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. पण ही बैठक निष्फळ ठरल्याची टीका शिवसेनेने केली आहे. सामनामधल्या अग्रलेखातून देशात प्रबळ विरोधी पक्ष नसल्याची टीका करण्यात आली आहे. एवढेच नाही तर मोदीविरोधी आघाडी निर्माण करण्यात शरद पवारांच्या प्रयत्नांना राहुल गांधी यांनी साथ देण्याची गरज आहे, राहुल गांधी मोदींविरोधात सध्या केवळ ट्विटरच्या मैदानात असतात, असा टोलाही लगावण्यात आला आहे. या अग्रलेखातून काय टीका करण्यात आली आहे ते पाहूया...
श्री. शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 'जनपथ' या निवासस्थानी 'राष्ट्रमंच' नामक विरोधी पक्ष गटाची एक बैठक झाली. बैठक अडीच तास झाली असे म्हणतात. या बैठकीचा बराच गाजावाजा 'मीडिया'ने केला. अर्थात बैठकीआधी हा 'राष्ट्रमंच' जेवढा गाजला तेवढे त्याच्या बैठकीतून काही निष्पन्न झाले नाही. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत, परंतु ते सोडविण्याचे व्हिजन सरकारकडे नाही.
भाजप विरोध किंवा मोदी विरोध हाच एकमेव समविचार असल्याने काही लोक त्यात सामील झाले. जावेद अख्तर, नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे बिनॉय विस्वम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे निलोत्पल बसू, माजी न्यायमूर्ती ए. पी. शहा, पवन वर्मा, आम आदमी पक्षाचे सुशील गुप्ता व सुधींद्र कुलकर्णी असे काही लोक उपस्थित होते. या बैठकीत राजकीय चर्चेबरोबरच कोरोना संकट,वाढती महागाई, बेरोजगारी अशा प्रश्नांवर विचारमंथन झाले. म्हणजे नक्की काय झाले? पवारांच्या '6 जनपथ'वर हे जे लोक जमले ते राजकीय कृतीपेक्षा विचार मंथनावर भर देणारे होते. पवारांचे घर, पवारांचे चाय-बिस्कुट व आपली काय ती विचारमंथनांची घुसळण असा फक्कडसा बेत दिल्लीत झाला. त्याचा फक्त आस्वाद घेण्याचे काम पवार यांनी केले. कारण नंतरच्या पत्रकार परिषदेत पवार उपस्थित राहिले नाहीत. मोदी किंवा भाजपविरुद्ध आघाडी हे एकमेव ध्येय ठेवूनच विरोधी पक्षांची 'मोट' बांधायची काय? यावरच आधी विचारमंथन होणे गरजेचे आहे.
देशापुढे आज प्र्रश्नांचा डोंगर आहे व ती विद्यमान सरकारची देणगी आहे हेदेखील खरे, पण त्यावर पर्यायी नेतृत्वाचा विचार काय? ते कोणीच सांगू शकत नाही. विरोधी पक्षांची एकजूट हवीच. ती संसदीय लोकशाहीची गरज आहे. पण गेल्या सात वर्षांत विरोधी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील अस्तित्व अजिबात दिसत नाही.
कालच्या दिल्लीतील मंथनात यापैकी एकही पक्ष किंवा नेता हजर नव्हता. काँग्रेस पक्षाने 'राष्ट्रमंच'ला महत्त्व दिले नाही. खरे तर मंगळवारी शरद पवारांनी विरोधी पक्षाचे जे चहापान केले तसे सोहळे दिल्लीत राहुल गांधी यांनी सुरू केले तर मरगळलेल्या विरोधी पक्षांच्या चेहऱयावर तरतरीत भाव दिसू लागतील. पंतप्रधान मोदी व त्यांच्या सरकारची लोकप्रियता पूर्वीची राहिलेली नाही. ती घसरली आहे, पण त्या घसरलेल्या जागेवर सध्याचा विरोधी पक्ष वाढतोय, रुजतोय असे दिसत नाही. काही राज्यांतील निवडणुकांत विरोधी पक्षांचा विजय झाला. ती विजयाची सळसळही आता थंड झाली.
दिल्लीत ठाण मांडून बसेल व देशातील समस्त विरोधी पक्षांशी समन्वय घडवेल, अशी व्यवस्था इतक्या दिवसांत घडू शकलेली नाही. शरद पवार हे सर्व घडवू शकतात, पण पुन्हा नेतृत्वाचा प्रश्न उपस्थित केला जातो. काँग्रेसने याकामी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेस पक्ष स्वतःच गेले कित्येक महिने राष्ट्रीय अध्यक्षांविनाच हालतडुलत आहे. खरे म्हणजे काँग्रेससारखा प्रमुख विरोधी पक्ष या सर्व घडामोडीत बरोबरीने उतरायला हवा. विरोधकांची एकजूट करण्याच्या शरद पवारांच्या या प्रयत्नात राहुल गांधींसारख्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्याने सहभागी व्हायला हवे. तरच विरोधी पक्षांच्या एकत्रित शक्तीला खरे बळ प्राप्त होऊ शकेल. हे खरे आहे की, राहुल गांधी हे मोदींच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या चुकांवर हल्ले करीत आहेत, पण ते 'ट्विटर'च्या मैदानावर. 'युपीए' नावाची संघटना आहे, पण देशात प्रबळ, संघटित विरोधी पक्ष आहे काय? हा प्रश्न लटकूनच पडला आहे. पवारांच्या घरी 'राष्ट्रमंच'चे चहापान झाले. त्यानिमित्ताने विरोधी पक्ष नक्की कोठे आहे? या प्रश्नाला वाचा फुटली इतकेच. निदान त्यासाठी तरी 'राष्ट्रमंच'वाल्यांचे आभार मानायला हरकत नाही.