शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री अडगळीत, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यातही बेदखल
शरद पवार यांच्यावर टीका केल्याने निष्ठावान शिवसैनिक अडगळीत टाकला जात असल्याची शिवसैनिकांची भावना आहे.
X
नगरपंचायत निवडणूकांमध्ये झालेल्या पराभवानंतर अखेर शिवसेनेने शिवसंपर्क यात्रेला सुरूवात केली आहे. त्यातच आदित्य ठाकरे यांचा तीन दिवसीय कोकण दौरा सुरू आहे. मात्र या दौऱ्यात शिवसेनेच्या बॅनरवरून शिवसेनेच्या माजी केंद्रीय मंत्र्याला बेदखल करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.
कोरोना महामारी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आजारपणामुळे राज्यात शिवसेनेला मरगळ आली होती. त्याचा फटका राज्यातील नगरपंचायत निवडणूकीत बसला. त्यामुळे अखेर अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच शिवसेनेने शिवसंपर्क यात्रेचे आयोजन केले आहे. दरम्यान पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यात रायगडमध्ये शिवसेनेचे माजी मंत्री अनंत गिते यांना बॅनरवरून बेदखल करण्यात आले आहे.
शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज रायगड दौऱ्यावर आहेत. तर त्यांच्या स्वागतासाठी जिल्हाभरात बॅनर झळकत आहेत. मात्र या बॅनरवर शिवसेनेचे सहा वेळा खासदार आणि दोन वेळा केंद्रीय मंत्री राहिलेल्या अनंत गिते यांना शिवसेनेच्या बॅनरवरून बेदखल करण्यात आले आहे. तर या घटनेची रायगड जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
आदित्य ठाकरे यांचा २८ , २ ९ व ३० मार्च असा ३ दिवसांचा कोकण दौरा होता. त्यात सिंधुदुर्ग , रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात विविध विकासकामांची उद्घाटने, भूमिपूजने तसेच शिवसैनिकांशी संवाद असा कार्यक्रम आहे. तर ३० मार्च रोजी रायगडमधील लोणेरे येथील डॉ . बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात वसतीगृहाचे भूमिपूजन तसेच दुपारी ३ वाजता माणगाव येथे शिवसैनिकांचा मेळावा होत आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरू आहे . तर आदित्य ठाकरे यांच्या स्वागताचे ठिकठिकाणी बॅनर लागलेले आहेत. या बॅनरवर उद्योगमंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत तसेच शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर यांची छबी झळकत आहे. तसेच जिल्ह्यातील आमदार आणि प्रमुख पदाधिकारी यांचेही फोटो आहेत. मात्र ६ वेळा खासदार आणि दोन वेळा केंद्रीय मंत्री राहिलेले अनंत गीते यांच्या फोटोला बॅनरवर स्थान मिळालेले दिसत नाही. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
पक्षनेतृत्त्वावर नाराजी
मागील लोकसभा निवडणुकीत अनंत गीते यांचा सुनील तटकरे यांनी पराभव केला. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. तर त्या सरकारमध्ये सुनिल तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्रीपद देण्यात आले. तेव्हापासून अनंत गिते पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत.
श्रीवर्धनमधील मेळाव्यात व्यक्त केला होता संताप
अतिशय संयमी अशी ओळख असलेल्या अनंत गीते यांनी सप्टेंबर महिन्यात श्रीवर्धन येथे झालेल्या मेळाव्यात आपल्या संतापाला वाट मोकळी करून देत थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर शरसंधान करत जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. त्यामुळे या घटनेने मातोश्रीबरोबरचे दुरावलेले संबंध आणखी ताणले गेले. तसेच पक्षनेतृत्वाने अनंत गिते यांच्या वक्तव्याची गंभीर दखल घेत त्यांना बेदखल केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अनंत गीते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यानंतर काही दिवसातच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झालेल्या रायगडमधील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत गीतेंच्या वक्तव्यावर चर्चा झाली . जिल्ह्यातील सेनेच्या कार्यक्रमाला गीतेंना बोलवायचे नाही किंवा त्यांचे छायाचित्र बॅनरवर वापरायचे नाही असा अलिखित निर्णयदेखील त्या बैठकीत घेण्यात आला होता. तेव्हापासून अनंत गीते रायगडच्या राजकारणात कुठेही सक्रिय दिसत नाही . आता आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने हा विषय पुन्हा एकदा चर्चेला आला आहे.
ज्येष्ठ नेता अडगळीत गेल्याचे शल्य
निष्ठावान आणि प्रामाणिक शिवसैनिक अशी अनंत गीते यांची ओळख आहे. दीर्घ राजकीय कारकीर्दीत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप नाही. मिस्टर क्लीन अशी प्रतिमा असलेले अनंत गीते यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली ती शिवसैनिकांनी पटली. परंतु सत्तेच्या सारीपाटाचा डोलारा सांभाळताना गीतेंसारखा नेता अडगळीत गेल्याचे शल्य रायगडमधील सामान्य शिवसैनिकांना सलत आहे, अशी भावना रायगडमधील शिवसैनिक व्यक्त करतात.