बहुमत चंचल असतं, अहंकारानं सत्ता चालवू नका : संजय राऊत राज्यसभेत कडाडले
महाराष्ट्र संतांची भुमी आहे. `निंदकाचे घर असावे शेजारी' असं संत तुकारामांनी म्हटलंय पण आज मात्र जो टीका करेल त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. शेतकरी आंदोलनालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला.'जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याला देशद्रोही ठरवलं जातं' अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप सरकारवर केली.
X
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या शिल्पकारांपैकी एक असलेले संजय राऊत हे सातत्यानं केंद्र सरकारवर टिका करत आहे. शेतकरी आंदोलना दरम्यान संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत चर्चा सुरू आहे. या दरम्यान संसदेत संजय राऊत काय बोलणार याची उत्सुकता होती.
गेल्या सहा वर्षांपासून खरं ऐकतोय आणि खोट्यालाही खरं मानतोय, असं पहिलंच वाक्य उच्चारत संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.जो खरं बोलतो किंवा लिहितो त्याला गद्दार, देशद्रोही संबोधलं जातं. जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा ठोकला जातो. पद्म पुरस्कार विजेते पत्रकार राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरूर, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनावर लिहिणारे पत्रकार मनजीत सिंह आणि अशा अनेक लेखक, पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं.
बहुमत चंचल असतं, अहंकारानं सत्ता चालविली जाऊ शकत नाही. 'निंदकाचे घर असावे शेजारी' असं संत तुकारामांनी म्हटलंय.पण आज मात्र जो टीका करेल त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. आज शेतकरी आंदोलनालाही बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. ही गोष्ट देशाच्या प्रतिष्ठेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी ही चांगली गोष्ट नाही, असंही संजय राऊत म्हणाले. लाल किल्ल्यावर तिरंग्याचा अपमान झाला. पण हा अपमान कुणी केला? त्याला मात्र तुम्ही पकडू शकलेला नाहीत, असा प्रश्न संजय राऊत यांनी राज्यसभेत उपस्थित केला.
प्रश्न विचारणारे सगळे देशद्रोही आहेत मात्र देशप्रेमी कोण आहे तर अर्नब गोस्वामी, कंगना राणौत? हे देशप्रेमी आहेत का? असा प्रश्न विचारत यांना सरकारनं शरण दिल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केलाय. प्रकाश जावडेकारांबद्दल व्हाटस्अप चाटमधे अर्णब काय बोलला हे पहा असं राऊत म्हणाले. शेतकरी आंदोलनाची एकजुटता तोडण्यात सरकारला अपयश आलं. हजारो शेतकरी गाझीपूर, सिंघू सीमेवर आपल्या हक्कासाठी लढत आहेत आणि या एकजुटतेमध्ये तुम्हाला देशद्रोह दिसतो. पंजाब, हरयाणाचा शेतकरी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतोय... ही केवळ तीन राज्यांची लढाई नाही... संपूर्ण देश त्यांच्यासोबत आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शेतकरी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबद्दल कळकळ व्यक्त केली.
संजय राऊत यांनी शेतकऱ्यांवर करण्यात आलेल्या अटकेच्या कारवाईवरुन संताप व्यक्त केला आहे. ज्याप्रकारे शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात आहे ते देशासाठी योग्य नाही असंही ते म्हणाले. राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याने मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी असल्याचं सांगताना दिप सिद्धूला अद्याप अटक का करण्यात आलेली नाही अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत म्हणाले की, "ज्याप्रकारे शेतकरी आंदोलनाची बदनामी केली जात आहे ते योग्य नाही. तिरंग्याचा अपमान झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे संपूर्ण देश दु:खी आहे. पण सरकार तिरंग्याचा अपमान करण्यामागे असणाऱ्या खऱ्या आरोपींना अटक करत नाही. दिप सिद्धू कुठे आहे? त्याला अटक केला जात नाही. पण सरकारने २०० शेतकऱ्यांना अटक केली आहे, असा आरोप संजय राऊतांनी शेवटी केला".