Home > Max Political > भगव्याचे पेटंट कुणाकडे? भाजप विरुद्ध शिवसेना'सामना'

भगव्याचे पेटंट कुणाकडे? भाजप विरुद्ध शिवसेना'सामना'

मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग देवेंद्र फडणवीस यांनी फुंकले आणि मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवण्याचा निर्धार केला. पण शिवसेनेने आता फडणवीस यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून हल्ला करत इशारा दिला आहे.

भगव्याचे पेटंट कुणाकडे? भाजप विरुद्ध शिवसेनासामना
X

मुंबई महापालिका निवडणूक जिंकून महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवण्याचा निर्धार देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच जाहीर केला. यानंतर शिवसेनने सामनामधून भाजपवर तोफ डागत भगव्या रंगावर शिवसेनेचा हक्क असल्याचा दावा केला आहे. तसंच मुंबई महापालिका ताब्यात घेण्याचा विचार कराल तर भस्म होऊन जाल असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला आहे. पाहूया या अग्रलेखात काय टीका करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची तमाम जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल. मुंबई महापालिकेवरील भगवा हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे तेज आहे. भूगर्भामध्ये प्रचंड खळबळ माजून पृथ्वीच्या तप्त अंतःकरणाचे कढ बाहेर आले आणि शांत झाले. त्यातूनच सह्याद्रीचा जन्म झाला. त्याच खळबळीत मुंबईचा जन्म झाला. मुंबई म्हणजे सदैव उसळणारा अग्नी आहे. या अग्नीचा रंग भगवा आहे. भगवा शुद्धच आहे. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल. इतिहासाच्या पानोपानी याचे दाखले आहेत. मुंबई महापालिकेवर नव्या ईस्ट इंडिया कंपनीचा 'युनियन जॅक' फडकविण्याची भाषा करणाऱ्यांनी हे विसरू नये

मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भारतीय जनता पक्षाने असे ठरवले आहे की, या वेळी मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा. आता हा शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे. बिहारच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत, पण त्या जिंकताना त्यांचा कसा दम निघाला ते देशाने पाहिले. बिहार निवडणुकीचे प्रभारी आपले देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे विजयाचे श्रेय मोदींइतकेच फडणवीस यांच्याकडेही जाते. प्रश्न इतकाच आहे की, बिहारच्या विजयाने भाजपचा नक्की कोणता झेंडा पाटण्यावर फडकला आहे? विचारांचा झेंडा एकच असतो. त्यात भेसळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बिहारवर भगवा फडकवू किंवा भगवा फडकला असे विधान भाजप पुढाऱ्यांकडून झाल्याचे स्मरत नाही. कारण त्यांचा तसा भगव्याशी संबंध नाही. शिवसेनेशी युती झाल्यापासून त्यांचा भगव्याशी संबंध आला.

शिवरायांचे सातारा व कोल्हापूरच्या गादीचे वंशज भाजपमध्ये सामील करून घेतले आहेत, पण भगव्याची मालकी मराठी शिवरायांच्या प्रजेकडे म्हणजे मराठी जनांकडेच आहे. तोच भगवा मुंबईवर पन्नास वर्षांपासून फडकत आहे. हा भगवा उतरवून वेगळा झेंडा फडकवणे ही महाराष्ट्राशी आणि छत्रपती शिवरायांशी प्रतारणा आहे. मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क नाकारण्यासारखेच आहे. मुंबई महापालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसांचे मुंबईशी नाते तोडण्यासारखेच आहे. भगवा उतरविणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे.

मुंबई महापालिकेवरील भगवा राजकीय स्वार्थासाठी उतरवायचा आहे. धन्य धन्य त्या दळभद्री विचारांची! महाराष्ट्राच्या मातीतून हे असे कोळसे निपजावेत व भगव्यास कलंक लागावा यासारखे दुर्दैव ते कोणते! भगवा हा जगभरात एकच आहे, तो म्हणजे शिवरायांचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचाच! मुंबई महापालिकेवरील भगव्याची चिंता ज्यांना वाटत आहे ते सगळे बेगडी नरवीर बेळगावच्या महानगरपालिकेवरील भगवा भाजपच्याच नतद्रष्टांनी उतरविला तेव्हा कोणत्या बिळात लपले होते? मुंबईवरील भगवा उतरविण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले ते राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाले.

Updated : 20 Nov 2020 7:17 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top