३० वर्ष सापाच्या पिल्लाला दूध पाजले, मुख्यमंत्र्यांचा भाजपवर संताप
X
राज्याच्या बजेट अधिवेशनाला गुरूवारुपासून सुरूवात झाली. पण अधिवेशनाची सुरूवातच वादळी झाली आहे. विरोधकांनी नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केले. तर सत्ताधाऱ्यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावेळी घोषणाबाजी केल्याने राज्यपालांनी भाषण अर्धवट सोडले. त्यामुळे हे अधिवेशन वादळी होणार असल्याचे पहिल्याच दिवशी दिसले आहे.
दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांची मंत्री छगन भुजबळ यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला. आम्ही ३० वर्ष सापाच्या पिल्लाला दूध पाजलं, ते वळवळ करत होतं पण आता आमच्यावरच ते फुत्कारत आहे, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर टीका केली आहे. नवाब मलिक यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप करत भाजपने त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. यालाही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले. देशात आता घृणास्पद पद्धतीचे राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली. हिंमत असेल तर दाऊदला शोधून का आणत नाहीत, असा त्यांनी विचारला आहे. पाकिस्तानला जाऊन नवाज शरीफ यांचा केक खाता, मग दाऊदला अटक का करत नाहीत, असा प्रश्नही मुख्यमंत्र्यांनी भाजपला विचारला आहे.
सध्या केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया राज्यात वाढल्या आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाष्य केले. सध्या धाडी घालून काहींना अटक केली गेली आहे. पण हे प्रकार आम्ही आता खपवून घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. आम्ही कुणावर स्वत: हून वार करत नाही आणि कुणी केला, तर त्याला सोडत नाही, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच सरकार पाडण्याच्या भाजपच्या दाव्यांना उत्तर भाजपने आपले १७० मोहरे फोडून दाखवावे, असे आव्हान देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.