चमत्काराची खात्री असताना अघोरी प्रयोग का? सामनातून भाजपला सवाल
राज्यसभा निवडणूकीप्रमाणेच भाजप विधानपरिषद निवडणूकीतही चमत्कार घडवण्याचा दावा करीत आहे. त्यावर शिवसेनेने सामनातून भाजपवर टीका केली आहे.
X
राज्यसभा निवडणूकीत (Rajyasabha Election) भाजपने राजकीय चमत्कार घडवत शिवसेना उमेदवार संजय पवार यांचा पराभव केला. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत शिवसेनेकडून सावधगिरीने पावलं टाकले जात आहेत. त्यापार्श्वभुमीवर विधानपरिषद निवडणूकीतही भाजप पुन्हा चमत्कार करण्याचा दावा केला जात आहे. त्यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका केली आहे. (Shivsena Criticize to BJP on Vidhanparishad election )
सामनाच्या अग्रलेखात (Samna Editorial) म्हटले आहे की, राज्यसभेची तिसरी जागा भाजपने जिंकली. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीतही चमत्कार होत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. मात्र राज्यसभेची निवडणूक भाजपने सरळ मार्गाने आणि नियमाने जिंकली नसल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. मात्र राजकारणात हे सगळं माफ असतं. त्यातच मोदीयुग सुरू झाले ते राजकारण नसून दुष्टकारण असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.
राज्यसभा निवडणूक टाळता आली असती. त्यानंतर विधानपरिषद निवडणूकही (Vidhanparishad election) टाळता आली असती. कारण पाचव्या जागेसाठी भाजपला 20 मतांची गरज आहे. मात्र तरीही ही जागा आम्हीच जिंकणार असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे. त्यावरही शिवसेनेने प्रहार केला.
हातात केंद्रीय तपास यंत्रणा, सत्ता आणि न्यायपालिकेचे दोरखंड असल्याने सर्व प्रकारचे दबाव वापरून निवडणूकीत उमेदवार उभा करून निवडणूक जिंकायची, असा टोला लगावत आयपीएलमध्ये गुजरात अशाच प्रकारे जिंकले असल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला असल्याचा संदर्भ सामनातून दिला आहे. याबरोबरच अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि नवाब मलिक (Nawab Malik) यांना जामीन न मिळाल्याने शिवसेनेने न्यायालयावरही हल्लाबोल केला आहे. (Samna criticize to Court)
नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क नाकारण्याची खेळी भाजप करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने सामनातून केला. तसंच राज्यसभा निवडणूकीत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाचा अधिकार नाकारला. तर आता विधानपरिषद निवडणूकीतही मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. हे कोणत्या संविधानात बसते? असा सवाल उपस्थित केला.
त्याबरोबरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना कुठल्याही न्यायालयाने गुन्हेगार ठरवले नाही. त्यांच्यावर कुठलाही खटला सुरू झाला नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात बनावट गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असल्याचा गंभीर आरोप सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.
अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांची आमदारकी शाबूत असताना त्यांना मतदानापासून रोखण्यात आले आहे. हा घटनेचा आणि लोकशाहीचा खून असल्याचा आरोप सामनातून करण्यात आला. तसंच मतदानाचा अधिकार कायदा, 1951 नुसार खुनाच्या आरोपात असलेल्या गुन्हेगारालाही तुरुंगातून मतदान करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना एक तासासाठी विधानभवन येथे मतदानासाठी आणणे शक्य होते. मात्र विधानभवन येथून ते भुमीगत होतील किंवा पळून जातील, अशी शक्यता वाटल्याने ईडीने त्यांच्या जामीनाला विरोध केला हा मुर्खपणा असल्याची टीका सामनातून केली आहे.
ईडी म्हणजे सर्वोच्च न्यायालय नाही. पण एकीकडे राम रहीमला आजन्म कारावासाची शिक्षा असतानाही त्याला एक महिन्याची सुटी देण्यात आली. लखीमपूर खेरी प्रकरणातील आरोपी मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा यालाही निवडणूक काळात सुटी देण्यात आली. त्याप्रकारे महाराष्ट्रातील आमदारांना मतदानासाठी एक तासाची सुटी देण्यात येऊ नये, यावर शिवसेनेने आश्चर्य व्यक्त केले आहे.
मोदींच्या काळात भेदाभेदीचे टोक
सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. पण जर न्यायालयांनीही आपला विवेक गमावला तर कसं होईल? असा सवाल केला आहे. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना जामीन नाकारणे म्हणजे दुसऱ्या बाजूला राजकीय दिलासा देण्याचा प्रकार असल्याचे सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे. विरोधकांची मतं बाद करणे, मतदान करण्यापासून रोखणे आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करणे यात कसली आली मर्दुमकी, असा सवाल सामनातून केला आहे.
राज्यसभा निवडणूकीत खुल्या पध्दतीने मतदान होते. ते विधानपरिषदेतही तसेच व्हायला हवे. पण खुल्या मतदानाचा नियम हा पक्षांना लागू होतो. अपक्षांना नाही. तर यामध्ये अपक्षांचा दोष नाही. तसंच लोकशाहीला मालक मिळाले की लोकशाहीचे हुकूमशाहीत रुपांतर होते. मालकांच्या विजयासाठी सर्व यंत्रणा कामाला लागतात. त्यामुळे न्यायालये निष्पक्ष असल्याचा भ्रमनिरास होतो, असाही टोला शिवसेनेने लगावला आहे.
देहू येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांच्या पगडीवर भेदाभेद नको असं म्हटलं होतं. पण अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी नाकारणे हे भेदाभेदीचे राजकारण आहे. तर कर्करोगाशी झुंजत असलेले लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना स्ट्रेचरवरून आणले जाते. हा राजकीय स्वार्थ असल्याचे दिसून येत आहे. मात्र भाजप चमत्काराचा दावा करत आहे. मग विजयाची किंवा चमत्काराची एवढीच खात्री आहे तर अमानुष आणि अघोरी प्रयोग कशासाठी असा सवाल उपस्थित केला आहे. याबरोबरच राजकारणासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकतो, असेही यावेळी शिवसेनेने भाजपवर टीका करताना म्हटले.