जळगाव महापालिकेत शिवसेनेचा महापौर, भाजपचे तब्बल २७ नगरसेवक फुटले
X
सांगली पाठोपाठ आता जळगावमध्येही भाजपवर महापालिकेतील सत्ता गमावण्याची नामुष्की आली आहे. शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी 45 मतं मिळवून विजय प्राप्त केला आहे. तर भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार प्रतिभा कापसे यांना 30 मते मिळाली आहेत. भाजपसाठी चिंतेची बाब म्हणजे भाजपचे 27 नगरसेवक फुटले. तर एमआयएमच्या तीन आणि शिवसेनेच्या 15 अशा एकूण 45 नगरसेवकांच्या मदतीने शिवसेनेने भाजपच्या हातून सत्ता काढून घेतली. तर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या कुलभूषण पाटील यांनी भाजपच्या सुरेश सोनवणे यांचा पराभव केला.
सकाळी 11 वाजता ऑनलाईन निवडणूक झाली. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे महापौर आणि उपमहापौरपदाचे उमेदवार उपस्थित होते. भाजपचे फुटीर नगरसेवक आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी ठाण्याहून आपला ऑनलाइन मतदानाचा हक्का बजावला. तर भाजपच्या उर्वरित नगरसेवकांनी तिथे गेलेल्या ठिकाणाहून मतदान केलं. पण अखेर शिवसेनेने बाजी मारत इथे भाजपला धक्का दिला.
गेल्या अडीच वर्षापूर्वी जळगाव आणि सांगली महापालिकेवर भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं होते. मात्र भाजपचं सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार आलं आणि सांगली महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने भाजपचे नगरसेवक फोडून सत्ता मिळवली. त्यानंतर महिना उलटत नाही तोच शिवसेनेनेही अवघ्या 15 नगरसेवकांचे संख्याबळ असतांना भाजपच्या नाराज 27 नगरसेवकांना आपल्या गळाला लावलं. त्यानंतर थेट मातोश्रीवरून हालचाली झाल्या आणि निवडणुकीच्या तीन दिवसअगोदार नाराज नगरसेवक ठाण्यात आणण्यात आले. एकूणच भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का देण्यात शिवसेना यशस्वी झाली आहे.