आघाडीत 'महाबिघाडी': शिवसेना मंत्र्यांच्या मतदारसंघातच सेना विरुध्द राष्ट्रवादी
राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा सुरू आहे. पण गदारोळात पैठण तालुक्यात लक्षवेधी लढत होणार आहे कारण इथे शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने आले आहेत.
X
औरंगाबाद: राज्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमुळे स्थानिक पातळीवरील राजकारण चांगलेच तापले आहे. तर राज्य पातळीवर राजकीय परिस्थिती पाहता ग्रामपंचायत निवडणूकीत मात्र चित्र उलट असल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीत सत्तेत सोबत असलेली शिवसेना-राष्ट्रवादी स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांच्या विरोधात रिंगणात उतरतांना पाहायला मिळत आहे.विशेष म्हणजे तेही कॅबिनेट मंत्र्यांच्या मतदारसंघातच.
शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांचा मतदारसंघ असलेल्या पैठण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात थेट राष्ट्रवादीनेच दंड थोपटले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणूका चांगलीच चुरशीच्या होणार असल्याचे दिसत आहे.
पैठण तालुक्यातील एकूण 80 ग्रामपंचायतींच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी भुमरे यांनी आपले वर्चस्व आणि प्रतिष्ठा कायम राहावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरू केली होती. मंत्री झाल्यावर त्यांचे दौरे इतर ठिकाणांपेक्षा मतदारसंघातच अधिक असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे तालुक्यातील भुमरे यांची पकड अधिकच आहे. मात्र आता थेट सत्तेत असलेल्या मित्रा पक्षांनेच विरोधात उडी घेतल्याने पैठण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक आपल्या ताब्यात कायम ठेवण्याचे भुमरे यांच्यासमोर आव्हान ठरणार आहे.
प्रमुख नेते काय म्हणतात..
संजय वाघचौरे ,माजी आमदार -राष्ट्रवादी
"आमची थेट लढत शिवसेनेशी असणार आहे. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळणार आहे. गेल्या वेळीही आमच्या पक्षाला तालुक्यात मोठ्याप्रमाणात ग्रामपंचायतीवर विजय मिळाला होता. यावेळी सुद्धा तो विजय आम्ही कायम ठेवणार आहोत."
संदिपान भुमरे, कॅबिनेट मंत्री – शिवसेना
"राष्ट्रवादीचे नेते काय म्हणत आहे, मला माहित नाही. पण आम्ही ग्रामपंचायत निवडणूका महाविकासआघाडी म्हणूनच लढणार आहोत."
दत्ता गोर्डे,राष्ट्रवादी नेते"
"ग्रामपंचायत निवडणुकीत आमची खरी लढत फक्त भुमरे यांच्याविरोधात असणार आहे. त्यामुळे वरती जरी महाविकास आघाडी असेल पण या निवडणुकीत राष्ट्रवादी थेट शिवसेनेच्या विरोधात मैदानात राहणार आहे.
सुरुज लोळगे,जिल्हा अध्यक्ष-भाजयुमो
"राज्यात असलेली महाविकास आघाडीची युती कुणालाही मान्य असणारी युती नाहीये. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत हे तिन्ही पक्ष स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी एकमेकांच्या विरोधात लढत आहे, आणि याचा नक्कीच फायदा भाजपला होणार आहे. त्यामुळे पूर्णक्षमतेने आम्ही मैदानात उतरलो आहोत."