दिल्लीत विरोधकांच्या बैठकीला शिवसेना गैरहजर का? संजय राऊतांनी सांगितले कारण
X
दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी आज संध्याकाळी विरोधकांची बैठख बोलावण्यात आली आहे. पण या बैठकीत शिवसेना मात्र सहभागी होणार नाहीये. यासंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवारांनी जी बैठक बोलवली आहे ती विरोधी पक्षाची नाही तर यशवंत सिन्हा यांच्या राष्ट्र मंचची आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे. देशात एका प्रबळ विरोधी पक्षासाठी कुणी प्रयत्न करत असेल तर त्यात चूक काय, असा सवालही त्यांनी विचारला आहे. पण ही भाजपाविरोधी किंवा युपीएविरोधी ही बैठक आहे असं कुणीही म्हटलेले नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
या बैठकीला काँग्रेस, सपा हे पक्षदेखील उपस्थित राहणार नाहीयेत, त्यामुळे ही विरोधकांची बैठक आहे, असे म्हणता येणार नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान यशवंत सिन्हा यांनी त्यांच्या राष्ट्रीय मंचद्वारे ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत भाजपविरोधात राष्ट्रीय आघाडी निर्माण करण्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यात शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात सोमवारीच दुसऱ्यांदा चर्चा झाल्याने आजच्या बैठकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.