भाजप अजूनही जवळ आहेत, असं शिवसेना नेते का सांगतात?
शिवसेनेला कसली भीती वाटते? शिवसेना भाजप च्या जवळकीने शरद पवार अस्वस्थ झाले आहेत का? राष्ट्रवादी शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता आहे का? वाचा राजकारणातील घडामोडींचं मॅक्समहाराष्ट्र चे कार्यकारी संपादक विलास आठवले यांचं टू द पॉइंट विश्लेषण
X
आजही भाजपा आमच्याजवळ संजय राऊत यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पण या विधानापुढे संजय राऊत यांनी तूर्त भाजपबरोबर युती नाही. अशी गुगलीही टाकली आहे.
महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवार यांना ओळखलं जात असलं तरी खरे शिल्पकार संजय राऊत आहेत. त्यांचे आणि शरद पवार यांचे संबध महाविकास आघाडी बनवण्यासाठी कामाला आले. पण आता तेच संजय राऊत भाजप आणि शिवसेनेचे संबध चांगले आहेत. असं सांगत आहेत. याचा अर्थ पाणी कुठे ना कुठे मुरत आहे हे नक्की.
ईडी आणि सीबीआय च्या कारवायांनी महाविकास आघाडीचे मंत्री जेरीस आले आहेत. अऩिल देशमुख, प्रताप सरनाईक, झाल्यावर आता थेट रवींद्र वायकर आणि अनिल परब यांच्यापर्यंत सुई पोहोचणार हे निश्चित आहे. असं भाजपवाले खाजगीत सागंतात. म्हणून प्रताप सरनाईक यांनी या सर्व प्रकरणाचा उल्लेख करून भाजप बरोबर जुळवून घ्या असा पवित्रा घेतला आहे.
प्रताप सरनाईक हे मातोश्रीच्या जवळ मानले जातात. त्यामुळे उध्दव ठाकरेंच्या मनात आपल्या शिलेदारांची चिंता असणारच हे नक्की पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते व्यक्त होत नाहीत.
शिवसेनेला खरी चिंता आहे. ती अनिल परब यांची आणि त्यांच्या जोडीला मिलिंद नार्वेकर यांची. अनिल परब जी भूमिका आज वटवत आहेत. तिच भूमिका ते महाविकास आघाडीचं सरकार येण्यापूर्वी वठवत होते. त्यामुळे मातोश्रीचं सर्व आर्थिक व्यवहार हे मिलिंद नार्वेकर आणि आता अनिल परब यांच्या म्हणण्यानुसारच पुढे सरकतात. हे सत्य कोणीही नाकारत नाही.
म्हणूनच जर भाजपला म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांना जरा थांबवायचे असेल तर शिवसेनेला दोन पावलं मागे यावी लागणार आहेत. आणि म्हणूनच संजय राऊत यांच्या विधानाला मोठा अर्थ आहे. भविष्यात महाविकास आघाडीचं गणित बिघडलं तर भाजप हा मित्रच होता. हे सातत्याने सांगत रहायचं म्हणजे पुढची गणितं सोप्पी होतात असं साधं तत्त्व शिवसेनेला आता पाळावं लागणार हे निश्चित.
महाविकास आघाडी करताना संजय राऊत आणि उध्दव ठाकरे यांची वक्तव्य पाहिली तर लक्षात येईल की, शरद पवार यांच्या साथीने पाच वर्ष सहज काढू असं शिवसेनेला आणि राष्ट्रवादी कॉग्रसला वाटत होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. MVA Government in Danger what is sharad Pawar Stand
आता थेट अमित शहा यांनी अजित पवार आणि अनिल परब यांची नावं सीबीआय कडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत आलेला ठराव हा निश्चितच प्रदेश नेतृत्वाच्या डोक्यातून आलेला नाही. तो थेट केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरून आलेला आहे.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची आर्थिक नाडी म्हणजे सहकार क्षेत्र ते उध्वस्त करायचं असा डाव आत्ताचा नाही. तो राष्ट्रीय स्वंयंसेवक संघाच्या चर्चेतून भाजपच्या मंथनातून आलेला आहे. हे समजायला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेसने खूप उशिर केला आहे. या दोन्ही पक्षाबरोबर आता शिवसेनेलाही फरफटत जावं लागेल.
आणखी एक महत्त्वाचं की अनिल देशमुख यांना टारगेट करताना अनेक अधिकारी इडीच्या कोठडीत आहेत. पण परमवीरसिंग मात्र, मोकळेच आहेत. यावरून स्पष्ट आहे की, राजकीय सूडापोटी भाजप राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना बदनाम करून शरद पवार यांना हतबल करण्याचा डाव आखत आहे. एकदा शरद पवार हतबल झाले की, शिवसेना आपोआप भाजप सोबत येणार हे निश्चित. नाही तर शिवसेनेची ताकद वापरून भाजप एकट्याची सत्ता आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करणार हे दिसत आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपने जोरदार आघाडी उघडली असून थेट अजित पवार यांच्या विरोधात केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याचबरोबर मंत्री अनिल परब आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्ती व त्यांच्या विरोधातही सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
या घटनांवरून शिवसेना आणि भाजप चे संबंध चांगले नसल्याचे तरी ते पूर्णत: तोडलेले नाहीत. यासाठी प्रयत्न केला जातोय. हे तरी सध्याच्या घटनावरून दिसंतय.
शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बरोबर घरोबा केल्याने भाजपमध्ये टोकाची नाराजी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात रोज विरोधी पक्षाकडून आरोप केले जात होते. पण गेल्या काही दिवसात चंद्रकांत दादा आणि आशिष शेलार यांची वक्तव्य पाहिली तर शिवसेनेला जवळ करण्यात काही अडचण नाही हे स्पष्ट होतं. डोक्याला जरा जोर देऊन विचार केला तर पंधरा दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेशी जवळीक करण्यात काहीच वाईट नाही. अशा मतितार्थाची वकत्व आली होती. आणि त्याच वेळी नरेंद्र मोदी आणि उध्दव ठाकरे यांची भेटही झाली होती लक्षात घ्यायला हवं.
या भेटी नंतर मोदी आणि उध्दव ठाकरे यांची बंद दाराआड 30 मिनीटं चर्चाही झाली होती. आता या चर्चेत नुसता जिलेबी फाफडाच्या चर्चा तर झाल्या नसतील हे नक्की.
केंद्रीय तपास यंत्रणा या महाविकास आघाडीच्या विरोधात वापरून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार प्रताप सरनाईक, रवींद्र वायकर, अनिल परब असे मातोश्री चे शिलेदार या चौकशीत अडकले आहेत. त्यामुळे शिवसेना कार्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे इतकच नाही तर शिवसैनिक संभ्रमात आहेत. महत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांनी थेट भाजपला अंगावर घेतलेले नाही.
शिवसेनेच्या वर्धापन दिनी त्यांनी भाजपच्या केंद्र सरकारवर टीका केली नाही आणि राम मंदिराचा मुद्दा चर्चेला आणला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे नुकसान करत आहेत असंही शिवसैनिकांना वाटतं. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हे अग्रेसर असतात अशी खंत शिवसेनेच्या मंत्र्यांची आहे. भविष्यात शिवसेनेला मोठा तोटा होईल असा दावाही शिवसेनेचे आमदार खासदार करत आहेत.
त्यात इडीची चौकशी मातोश्री पर्यंत पोहोचली तर शिवसेना पक्षाची मोठी नाचक्की होऊ शकते. अशी भावनाही शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये असून संजय राऊत यांच्या वक्तव्याला काही तरी अर्थ आहे. असं आमदार खासगीत सांगतात.
राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी दगा दिला तर भाजप ही आम्हाला दूरची नाही. असं सांगण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या विधानातून मिळतो असं मानायला हरकत नाही. भले संजय राऊत यांनी आता जरी याचा नकार दिला तरी. कारण राजकारणात कोण कधी उठून पाठिंबा देईल. हे कोणी सांगू शकत नाही. पण तयारी तर सर्वांनाच करायची असते.
ताजा कलम: देवेद्र फडणवीस हे अमित शहांना कालच भेटले आहेत. अर्थात काही तरी शिजलं असणार हे निश्चित.