शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत समितीने मोठा निर्णय घेतला आहे.
X
शरद पवार (Sharad Pawar) यांनी लोक माझा सांगाती या आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात आपण राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) पक्षाचा अध्यक्ष म्हणून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते भावूक झाले होते. एवढंच नाही तर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा म्हणून आंदोलन आणि उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर शरद पवार यांनी दोन दिवसानंतर तुम्हाला आंदोलन किंवा उपोषण करण्याची वेळ येणार नसल्याचे म्हटले होते. मात्र यानंतर अखेर शरद पवार यांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत (press conference) शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला असल्याचे म्हटले.
यावेळी प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) म्हणाले की, लोक माझा सांगाती या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली. त्याची आम्हाला कुठलीही माहिती नव्हती. मात्र शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा संकल्प केला होता. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि समितीला नामंजूर आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समितीने शरद पवार यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा फेटाळला आहे. यानंतर आम्ही शरद पवार यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात समजावण्याचा प्रयत्न करू, असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे.
शरद पवार (Sharad Pawar ) यांच्या राजीनाम्यामुळे नव्या अध्यक्षांच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र आता पुन्हा शरद पवार यांचा राजीनामा फेटाळल्याने शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहण्याची शक्यता वाढली आहे.