महाराष्ट्राचे विषय मोदींच्या कानावर घातले : शरद पवार
महाराष्ट्रात वेगाने राजकीय घडामोडी होत असताना सर्वांना धक्का बसेल अशा पध्दतीनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं (narendra modi)ची दिल्लीत भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या भेटीत महाराष्ट्रातील दोन मुद्द्यांवरही चर्चा केल्याचं सांगत गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. महाविकास आघाडीने शिफारस केल्यानंतरही राज्यपालांनी १२ आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं नाही, हा विषय मी पंतप्रधानांसमोर मांडला असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. तसंच राज्यसभा खासदार आणि दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या अन्यायकारक कारवाईचा विषयही मी नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
X

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांची संसदेत पंतप्रधान कार्यालयात भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरु झाले होते. अखेर स्वत: शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भेटीचा संपूर्ण तपशील जाहीर केला. मोदींना लक्षद्वीपच्या प्रश्नांवर भेटण्यासाठी गेलो होतो. सोबत विधान परिषद सदस्य नियुक्ती तसंच संजय राऊतांवरील कारवाईबाबतही बोलणं झाल्याचं पवारांनी सांगितलं.
पवारांनी मोदींची भेट घेतल्याने राष्ट्रवादी पुन्हा भाजपशी जवळीक साधते आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना पवार म्हणाले, "महाविकास आघाडीचं सरकार उत्तम काम करतंय. उद्धव ठाकरे ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील तसंच महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल" असं ठामपणे सांगितलं.
लक्षद्वीपमध्ये प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्याकडून लक्षद्वीपमध्ये केल्या जाणाऱ्या विकास कामांविरोधात स्थानिक नागरिकांचा रोष असून गेल्या १५ महिन्यांपासून याबाबत नागरिक निषेध व्यक्त करत आहेत. तसंच प्रशासक प्रफुल्ल पटेल यांना हटविण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल पी.पी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
"पंतप्रधानांसोबत मी एकटा उपस्थित नव्हतो. मोहम्मद फैजल देखील उपस्थित होते. त्यांनी स्वत: पंतप्रधानांना सांगितली. मी फक्त तिथं उपस्थित होतो. मीही दोन मुद्दे पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिले आहेत. यात महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्नाबाबत त्यांच्याशी बोललो आहे. अजूनही त्या आमदारांची नियुक्ती झालेली नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिलं. तर दुसरं म्हणजे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर काल झालेल्या कारवाईचीही माहिती पंतप्रधानांना दिली", असं शरद पवार म्हणाले.
'यूपीएचं अध्यक्षपद आम्हाला देण्यात यावं, अशी माझी किंवा आमच्या पक्षाची भूमिका नाही. ही जबाबदारी घेण्याची माझी तयारी नाही. मात्र भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न करावे लागतील, ते मी करणार आहे.' 'पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी माझी भेट घेऊन देशातील भाजपेतर पक्षांना एकत्र आणत बैठक घेण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानुसार मी आता भाजपच्या विरोधात असणाऱ्या देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसोबत संपर्क साधण्यास सुरुवात करत आहे,' अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे
"संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आहेत आणि एका वृत्तपत्राचे संपादक आहेत. त्यांच्यावर कारवाई कोणत्या उद्देशानं केली. एका खासदारावर अशी कारवाई करण्यात आली आहे. त्याचं राहतं घर जप्त करण्यात आलं आहे. केंद्रीय यंत्रणांकडून ही कारवाई करण्यात आल्यानं त्याची माहिती पंतप्रधानांना दिली आहे", असं शरद पवार म्हणाले.
केंद्रीय संस्थांच्या गैरवापरावर बोलताना त्यांनी कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे मतदारांना ईडीची धमकी देण्याचे प्रकरण सांगून यावर अधिक भाष्य टाळले.
देशात महागाईच्या मुद्द्यावर आक्रोश असताना संसदेत महागाईवर चर्चा करु दिली जात नाही. आम्ही १० वर्षे सत्तेत असताना कधीही महागाईवरील चर्चा टाळली नाही असं त्यांनी आवर्जून सांगितलं.