Home > Max Political > देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बला शरद पवारांचे उत्तर

देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बला शरद पवारांचे उत्तर

देवेंद्र फडणवीस यांच्या पेनड्राईव्ह बॉम्बला शरद पवारांचे उत्तर
X

महाराष्ट्राची सत्ता भाजपच्या हातातून गेल्यानंतर विविध केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन सरकार अस्थिर करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. त्यामुळे अशाप्रकारची टोकाची भूमिका घेतली असावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केलेल्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.

१२५ तासांची रेकॉर्डिंग मिळवणं ही कौतुकास्पद बाब मात्र त्या रेकॉर्डिंगची सत्यता आधी तपासली गेली पाहिजे. त्यासंदर्भातील चौकशी राज्यसरकार नक्की करेल. त्या रेकॉर्डिंगमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या माझंही नाव घेतलं गेल्याचं दिसते आहे. मात्र माझंतरी यासंदर्भात कुणाशी बोलण्याचं काही कारण नाही असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनामध्ये प्रतिनिधीत्व करत असते, त्यावेळेस त्याच्यावरच्या तक्रारीची शहानिशा केल्याशिवाय भाष्य करणे योग्य नाही. विनाकारण तक्रार करून लोकप्रतिनिधींवर वेगवेगळ्या केंद्रीय यंत्रणांची मदत घेऊन त्यांना नाउमेद करण्याच्या प्रयत्न सध्या मोठ्या प्रमाणात होतोय. विशेषत: महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये त्याची संख्या अधिक आहे असेही शरद पवार म्हणाले.

सत्तेचा गैरवापर करून तपास यंत्रणांद्वारे चौकशी करण्याचे सगळ्यात मोठे उदाहरण हे अनिल देशमुख यांचे आहे. एकाच व्यक्तीच्या घरावर तब्बल ९० छापे टाकण्याचा प्रकार मी तरी पहिल्यांदाच पाहिला आहे असेही शरद पवार म्हणाले.

एका बाजूने आरोप करायचे आणि दुसऱ्या बाजूने छापे टाकायचे, याचा अर्थ केंद्राच्या यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे स्पष्ट होत आहे आणि सदर प्रकार हा संसदीय लोकशाहीच्या दृष्टीने अशोभनीय अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली. नवाब मलिकांनी राजीनामा द्यायचा काही संबंधच नाही असे बोलून विरोधकांच्या मागणीची शरद पवार यांनी हवा काढून टाकली आहे.

मुस्लिम नेता असला की त्याचा संबंध थेट दाऊदशी जोडला जावा हे फार निरर्थक आहे. एक पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी मजबूतीने उभे आहोत, असेही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान खासदार संजय राऊत यांनीदेखील केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेल्या गैरवापराचा विषय पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलेला आहे, त्यामुळे पंतप्रधान देखील याची खोलात जाऊन चौकशी करतील, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली.

Updated : 9 March 2022 1:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top