शरद पवार आणि गुलाबराव पाटील यांच्यात गुप्तगू...
X
सध्या महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना सत्तेत असली तरी लोकप्रिय मुख्यमंत्री पदाच्या जाहिरातीमुळं वाद सुरू झाल्याचं चित्र आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे नेते तथा महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकाच रेल्वेतून प्रवास केला. तब्बल दोन तास दोघांमध्ये चर्चाही झाली. मुंबईतून जळगावला येताना रेल्वेमध्ये ही भेट झालीय. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यापैकी कोण अधिक लोकप्रिय याबाबत दोन्ही पक्षात वाद सुरु असंताना पवार-पाटील यांची झालेली भेट, आणि दोघांमधील गुप्त चर्चेची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
शरद पवार आणि गुलाबराव पाटील हे आज मुंबई येथून दोन्ही नेते राजधानी एक्सप्रेसने जळगावला रात्री पोहोचत आहे. शरद पवार आज दुपारी चार वाजता मुंबईतून राजधानी एक्सप्रेसने जळगावच्या दिशेने निघाले. त्याचवेळी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे देखील कॅबिनेटची बैठक आटोपून मुंबईतून राजधानी एक्सप्रेसने जळगावच्या दिशेने निघाले. दोन्ही नेत्यांची राजधानी एक्सप्रेसमध्ये भेट झाली असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत
शरद पवार हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे उद्या (शुक्रवार दि. १६ जून) होणाऱ्या राष्ट्रवादी ग्रंथालय सेलच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये रेल्वेत नेमकी काय राजकीय चर्चा झाली याची माहिती मात्र समोर आलेली नाही.