Home > Max Political > देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचं ऐकणार?

देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचं ऐकणार?

राज्यसभेची सहावी जागा आम्हीच जिंकणार असा दावा दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीचं ऐकणार?
X

राज्यात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामध्ये सहाव्या जागेसाठी अटीतटीची लढत होणार आहे. त्यामुळे या सहाव्या जागेवर भाजप आणि शिवसेना दोन्हीही बाजूंनी दावा केला जात आहे. त्यातच शिवसेनेने ही जागा कोल्हापुरचे संजय पवार यांना दिली असून भाजपनेही कोल्हापुरच्या मैदानातील धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीची लढत ही कोल्हापुरच्या दोन मल्लांमध्ये होणार असल्याची चर्चा राज्यभर रंगली आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपने धनंजय महाडिक यांना निवडून आणण्याचा निश्चय केला असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यातच चंद्रकांत पाटील यांनी धनंजय महाडिक यांना निवडून आणण्यासाठी लागणाऱ्या अपक्षांची बेरीजही मांडली. तर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सहावी जागा शिवसेनाच जिंकणार असल्याचे म्हटले आहे. त्यापार्श्वभुमीवर महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, शिवसेना नेते अनिल देसाई आणि काँग्रेस नेते सुनिल केदार यांचा समावेश आहे. तर या बैठकीत धनंजय महाडिक यांची उमेदवारी माघारी घेण्याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गळ घातली जाऊ शकते. त्यामुळे या बैठकीनंतर धनंजय महाडिक यांची उमेदवारी माघारी घेतली जाणार का? हे निश्चित होणार आहे.

आज राज्यसभेची उमेदवारी माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. त्यापार्श्वभुमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने धनंजय महाडिक यांना माघार घ्यावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संजय राऊत यांचा गंभीर आरोप

संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्यात अपक्ष आमदारांच्या खरेदीसाठी कोट्यावधींची बोली लागली असल्याचे कानावर येत आहे. त्यामुळे ही फक्त पैशांची अफरातफर नसून मनी लाँडरींग आहे. म्हणून या प्रकरणाची ईडीमार्फत चौकशी व्हायला हवी, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

तसेच पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यामुळे राज्याची ढासळत चाललेली राजकीय पत राखण्यासाठी आणि राज्याची राजकीय प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे यातून योग्य मार्ग निघेल, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

Updated : 3 Jun 2022 11:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top