अजित पवार इतके मोठे झाले का?....., अजित पवार- शरद पवार भेटीवर संजय राऊत यांचं भाष्य
X
शरद पवार- अजित पवार भेटीनंतर महाविकास आघाडी टिकणार का? यावर प्रश्न निर्माण झाले होते. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी शरद पवार- अजित पवार भेटीवर भाष्य केलं आहे.
अजित पवार यांनी पुण्यात उद्योजक चोरडिया यांच्या घरी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्या बंडामागे शरद पवार यांचाच हात असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली आहे. त्यातच नाना पटोले यांनीही तातडीने उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे महाविकास आघाडीवर प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावर संजय राऊत यांनीही भाष्य करत शरद पवार यांनी यासंदर्भातील स्पष्ट भूमिका घ्यायला हवी, असं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांना ऑफर दिल्याची चर्चा होती. त्यावर प्रश्न विचारला असता संजय राऊत यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
यावेळी संजय राऊत म्हणाले, अजित पवार हे शरद पवार यांना भाजपची केंद्रीय स्तरावरची ऑफर घेऊन येतील, इतके अजित पवार कधी मोठे झाले? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
यावेळी संजय राऊत म्हणाले, अजित पवार आणि शरद पवार कौटुंबिक नात्यांनी बांधले गेलेले आहेत. त्यांच्या काही अडचणी आहेत त्या संदर्भात ते भेटले. पण शरद पवार हे त्यांच्या हयातीत भाजपशी हातमिळवणी करतील असं मला वाटत नाही. त्यामुळेच ते दोन दिवसापुर्वी सोलापूर आणि त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगर ला जात आहेत. त्यामुळे शरद पवार- अजित पवार यांच्या भेटीचा चुकीचा अर्थ काढण्याला अर्थ नाही. अजित पवार हे शरद पवार यांना ऑफर देऊ शकतील एवढे मोठे नेते नाहीत.