शासकीय रुग्णालये आजारी पडण्याची ही आहेत कारणे?
आधी ठाणे, मग नांदेड आणि त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील शासकीय रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूमुळे आरोग्य व्यवस्था आजारी असल्याचे समोर आले आहे. पण ही आरोग्य व्यवस्था आजारी असण्याची नेमकी कारणं काय आहेत? याचा सी टी स्कॅन करणारा मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी भरत मोहळकर यांचा स्पेशल रिपोर्ट....
X
आधी कळवा येथे 18, नांदेडमध्ये 48 तासात 37 तर छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले. पण या घटना घडल्याच का? याचच सी टी स्कॅन मॅक्स महाराष्ट्रने केला आहे.
१) सरकारची आरोग्य विभागाविषयी अनास्था
आरोग्य हा प्रत्येक व्यक्तीचा मुलभूत अधिकार आहे. मात्र या आरोग्य क्षेत्रावर GDP च्या 6 ते 7 टक्के खर्च करणे अपेक्षित असते. मात्र या आरोग्य व्यवस्थेवर GDP च्या 2.1 टक्के इतकाच खर्च केला जातो.
२) वाढणारी लोकसंख्या आणि अपुरे मनुष्यबळ
महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या ही 13 कोटी इतकी आहे. मात्र राज्यातील आरोग्य खात्यात वर्ग १ आणि वर्ग २ ची 2 हजार 175 पदं रिक्त आहेत. याबरोबरच क वर्ग आणि वर्ग ड च्या 10 हजार 949 जागा रिक्त आहेत. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था आजारी पडल्याचे दिसून येत आहे.
३) मेडिसीन खरेदीत सुसूत्रता नाही, त्यामुळे निर्माण होतो औषधांचा तुटवडा
मधुमेह, रक्तदाब, कर्करोग यासारखे आजार तसेच इतर आजारांवर उपचार करण्यासाठी औषध पुरवठा वेळेत होणे आवश्यक असते. मात्र या औषध पुरवठ्यात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य वैद्यकीय सेवा महामंडळ स्थापन केले. पण या महामंडळामार्फत औषध खरेदीच्या कामाला दिरंगाई होत आहे. यात शासनाकडून वेळकाढूपणा केला जात आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधांची खरेदी करावी लागते. मात्र वेळेवर औषधं न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता वाढते.
४) आधुनिक मशिनरींची संख्या कमी आणि कौशल्ययुक्त मनुष्यबळाचा अभाव
अनेक रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक साहित्यांची मागणी असतानाही ते साहित्य पुरवले जात नाही. त्याबरोबरच ज्या ठिकाणी अत्याधुनिक मशीन्स आहेत. तेथे ते तंत्रज्ञान हाताळणारे प्रशिक्षित लोक नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी मशीन्स धुळखात पडलेल्या आहेत.