राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर, एकला चलोचा नारा
राजू शेट्टी यांनी अखेर महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
X
राज्यातील महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याची घोषणा करत एकला चलो चा नारा दिला आहे. मात्र याबाबत राजू शेट्टी यांनी काही दिवसांपुर्वी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे संकेत दिले होते.
गेल्या काही दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटचे राजू शेट्टी महाविकास आघाडीवर नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच राजू शेट्टी यांनी राज्य सरकारने एफआरपीचे पाडलेले तुकडे, भुसंपादन याविषयांवरून राज्य सरकारच्या विरोधात भुमिका घेतली होती. तर शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याची मागणी करत ठिय्या आंदोलन छेडले होते. त्यामुळे राजू शेट्टी हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याची चर्चा होती.
राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या काळात राज्य सरकार विरोधात दंड थोपटले होते. तर शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी दिवसा वीज, अवाजवी वीज बील आणि वीज तोडणी यासारख्या मुद्द्यांवरून राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन छेडले होते. तर मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे कौतूक केले होते. तर राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे जाऊन विविध शेतकरी संघटनांची मोट बांधल्याची घोषणा केली. त्यापाठोपाठ आता कोल्हापुर येथे राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याची घोषणा केली आहे. तसेच आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली.
काय म्हणाले राजू शेट्टी-
राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून बाहेर पडत असल्याची घोषणा करतानाच सांगितले की, निवडणूक लढवता यावी म्हणून आपण चळवळ सुरू केली नाही. तर चळवळ टिकावी म्हणून आपण निवडणूक लढवत आहोत. त्यामुळे सध्यातरी भाजप सोबत जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
राजू शेट्टी म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मुद्द्यावर आघाडी झाली होती. तर साताऱ्याच्या सभेत पवार साहेब भिजले मात्र राज्यातील शेतकरी विरघळून केल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली.
महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांची भुमिका दिल्लीत असताना वेगळी असती. मुख्यमंत्री पदासाठी सूचक म्हणून मी चालतो. मात्र शेतकऱ्यांविषयी निर्णय घेतांना विचारलं देखील जात नसल्याची खंत राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. तसेच ऊस दर नियंत्रण समितीत शेतीशी संबंधीत नसलेले लोक का? असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला.
आमदाराच्या पुढे न बोलणारे कारखानदारांसमोर काय बोलतील, असे सांगत एकरकमी एफआरपीचे तुकडे पाडण्याबाबत महाविकास आघाडी सरकारने भुमिका घेतल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.