राज ठाकरे यांचे औरंगाबादमध्ये प्रक्षोभक भाषण
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेतून अत्यंत प्रक्षोभक भाषण केले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
X
राज ठाकरे यांचे औरंगाबाद येथील बहुचर्चित भाषण पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी अत्यंत प्रक्षोभक भाषण केले आहे. त्यामुळे राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात भोंग्याबाबत इशारा दिला होता. त्यानंतर ठाणे येथील सभेतही 3 मेचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत अत्यंत प्रक्षोभक भाषण केले आहे.
राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत बोलताना भोंग्यावरून पुन्हा एकदा मुस्लिम समाजाला इशारा दिला आहे. तर भोंगा हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. पण या विषयाला कोणी धार्मिक बनवण्याचा प्रयत्न केला तर त्याला धर्मानेच उत्तर द्यावे लागेल, असे चिथावणीखोर वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.
उत्तरप्रदेशात भोंगे उतरवले जाऊ शकतात मग महाराष्ट्रात का नाही? असा सवाल राज ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारला. तसेच सध्या किती मशिदींकडे परवानगी आहे? असे विचारत औरंगाबादमध्ये 600 मशिदी असून या ठिकाणी काय बांगची स्पर्धा चालते का? असे वादग्रस्त वक्तव्य राज ठाकरे यांनी केले.
राज ठाकरे म्हणाले, 3 मे रोजी ईद आहे. त्यामुळे 3 मे रोजी कोणत्याही प्रकारे धार्मिक तणाव करणार नाही. मात्र 4 मे रोजी नंतर आम्ही ऐकून घेणार नाही. त्याबरोबरच आमच्या मनगटात किती ताकद आहे, ते दाखवावेच लागेल, अशा प्रकारे राज ठाकरे यांनी चिथावणी दिली.
4 मे नंतर जर मशिदीवरील भोंगे उतरवले नाही तर त्यांच्या समोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, असे आव्हान राज ठाकरे यांनी दिले.
मशिदीत अजान सुरू झाल्यानंतर राज ठाकरे अचानक भडकले. तर यावेळी राज ठाकरे म्हणाले की, कोणीतरी त्यांच्या तोंडात बोळा कोंबा. त्यांना सरळ भाषेत समजत नसेल तर काय व्हायचं ते एकदा होऊनच जाऊ द्या. राज ठाकरे यांनी उपस्थितांना आवाहन केले की, आपण अजिबात शांत बसता कामा नये. औरंगाबादच्या पोलिसांना विनंती की यांना सरळ सांगून समजत नसेल तर महाराष्ट्राच्या मनगटातील ताकद यांना दाखवावीच लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी केला
तसेच मागचा पुढचा विचार करू नका, भोंगे उतरले पाहिजेत, असे राज ठाकरे म्हणाले. त्यामुळे राज ठाकरे यांचे भाषण वादात सापडण्याचा इशारा दिला असतानाही राज ठाकरे यांच्या भाषणाला परवानगी मिळाली. मात्र या सभेत राज ठाकरे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केल्याने राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.