Raj Thackeray Troll : जुन्या व्यंगचित्रावरून राज ठाकरे ट्रोल, पुणेकरांनी लावले बॅनर
राज ठाकरे यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे राज ठाकरे चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी ५ जून रोजी आयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली. त्यावरून राज ठाकरे यांना त्यांच्या जुन्या व्यंगचित्राची आठवण करून पुणेकरांनी बॅनरबाजी केली आहे.
X
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी भोंग्यावरून घेतलेल्या भुमिकेवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. तर राज ठाकरे भाजपचा हिंदूत्वाचा अजेंडा रेटत असल्याची टीकाही केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर राज ठाकरे यांनी ५ जून रोजी आयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याची घोषणा केली. त्यावरून राज ठाकरे यांचे जुने व्यंगचित्र शोधून काढून नेटकऱ्यांनी राज ठाकरे यांना जोरदार ट्रोल केले आहे. तर याच व्यंगचित्राचे बॅनर पुणे शहरात झळकले आहेत.
2019 च्या निवडणूकीपुर्वी राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत भाजपची पोलखोल केली होती. तर त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आयोध्दा दौरा केला होता. त्या दौऱ्यावर टीका करणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी त्यांच्या कुंचल्यातून रेखाटले होते. मात्र आता तेच व्यंगचित्र राज ठाकरेंसाठी अडचणीचे ठरले आहे.
राज ठाकरे यांनी उध्दव ठाकरे यांच्या आयोध्या दौऱ्यावर टीका करताना काढलेल्या व्यंगचित्रात राम लक्ष्मणाचे चित्र दाखवून त्यांच्या हातातील धनुष्य उध्दव ठाकरे, विश्व हिंदू परिषद आणि भाजपवर रोखले होते. तर उध्दव ठाकरे, विश्व हिंदू परिषद आणि भाजप अशा व्यंगचित्रांच्या वरच्या बाजूला चलो अयोध्या असे लिहीले होते. याबरोबरच या व्यंगचित्रावर राज ठाकरे यांनी लिहीले होते की, अहो देश फसलाय खड्ड्यात आणि आता माझ्या नावाने गळा काढत आहात! अरे लोकांनी तुमच्याकडे रामराज्य मागितले होते, रामराज्य नव्हे, असा टोला लगावला होता.
मात्र आता याच व्यंगचित्राची राज ठाकरे यांना आठवण करून देण्यासाठी पुण्यात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर या बॅनरवर राज ठाकरे यांचे हे व्यंगचित्र दिसून येत आहे. अशा प्रकारे राज ठाकरे यांच्या व्यंगचित्राची आठवण करून देणारे बॅनर पुण्यातील अलका टॉकिज चौक, गुडलक चौक आणि कोथरुड येथील करिष्मा चौक या ठिकाणी निनावी बॅनर आढळून आले आहेत.
राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्राचा बॅनर बनवून पुणेकरांनी लिहीले आहे की, राज ठाकरे यांनी स्वतः काढलेले व्यंगचित्र. तर त्याखाली लिहीले आहे की, अशी वेळ कोणावरही येऊ नये. तसेच पुढे लिहीले आहे की, उध्दव साहेब ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला आणि श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्या राज ठाकरे यांना शेवटी अयोध्येला जावे लागणारच. सोयीनुसार आणि सुपारीनुसार पोकळ हिंदूत्व... अशी टीका पुण्यात लावलेल्या बॅनरवरून करण्यात आली आहे.