Pune Loksabha | पुण्यात ‘एमआयएम’कडून अनिस सुंडके यांना उमेदवारी जाहीर
X
पुणे: गेल्या पंचवीस वर्षापासून पुणे येथील राजकारणात सक्रीय असलेले अनिस सुंडके यांची ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुदुल मुस्लिमिन पक्षातर्फे पुणे लोकसभा मतदारसंघ येथून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या निवडणूक प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे आले होते. याच दरम्यान झालेल्या जाहीर सभेत याप्रसंगी एमआयएम पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील कार्याध्यक्ष अब्दुल गफार कादरी, औरंगाबाद व पुणे येथील अनेक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते. यावेळी निर्णय जाहीर करण्यात आला.
खासदार ओवेसी यांनी सांगितले की आम्ही पुण्याच्या निवडणुकीमध्ये ताकदीने उतरणार आहोत. आम्ही का निवडणूक लढू नये? निवडणूक लढविली पाहिजे अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. मला खात्री आहे की पुण्याच्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाचे उमेदवार अनिस सुंडके भरघोस मताने निवडून येतील.
अनिस सुंडके आपल्या उमेदवारीबाबत काय म्हणाले?
सुंडके यांनी सांगितले की, गेल्या पंचवीस वर्षांपासून मी पुण्यातील राजकारणात सक्रिय आहे. सर्व जाती-धर्मांच्या लोकांशी माझे चांगले संबंध असून पुण्यातील अनेक प्रश्नांना मी मार्गी लावण्याचे काम केले आहे. गेल्या अनेक निवडणुकीत मी काँग्रेस पक्षाचा व नंतर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबत काम केले आहे. पुणे महानगरपालिकेत मी अनेक पदे भूषविलेली असून स्थायी समिती अध्यक्ष असताना पुण्यासाठी अनेक विधायक काम केली आहेत. आजी-माजी नगरसेवक माझ्या संपर्कात आहे. पुण्यातील अनेक दिग्गज आजी-माजी नगरसेवकांचा एमआयएम पक्षामध्ये जाहीर प्रवेश करून घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.