राहुल गांधी - प्रशांत किशोर भेट, राजकीय चर्चेला वेग
X
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची मंगळवारी भेट घेतली. या भेटीनंतर पुन्हा एकदा दिल्लीत राजकीय चर्चेला वेग आला आहे. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही भेट झाली, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. प्रशांत किशोर यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर मोदीविरोधी राष्ट्रीय आघाडीसाठी जुळवाजुळव सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांची भेट महत्त्वाची मानली जाते आहे. पण ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली याची माहिती मिळू शकलेली नाही. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार या बैठकीला प्रियंका गांधी, के.सी. वेणू गोपाल आणि पंजाब काँग्रेसचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते.
या बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली ते समजू शकलेले नाही. पण पंजाबमध्ये काँग्रेसअंतर्गत सुरू असलेल्या संघर्षावर चर्चा झाली असण्याचीही शक्यता आहे. कारण गेल्या आठवड्य़ात प्रशांत किशोर यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची भेट घेतली होती. पंजाबमध्ये काँग्रेसमध्येच सध्या धुसफूस सुरू आहे, पुढील वर्षाच्या सुरूवातीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा विचार करता पक्षाला या वादावर लवकरात लवकर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यामुळे या बैठकीत कोणत्या विषयावर रणनीती आखली जाते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.