प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे गमिनी कावा आंदोलन
X
वर्ध्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांसाठी कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलन केले. इथे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्या चेंबर बाहेर त्यांच्या नेम प्लेटला दोर बांधून आंदोलकांनी प्रतिकात्मक फास लावत आंदोलन केले. जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे हे आंदोलन सुरू होते. या नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांचे नेतृत्व करणाऱ्या विकास दांडगे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांशी चर्चा केली.
गेल्या अनेक वर्षांपासून वर्धा जिल्ह्यातील नवरगाव प्रकल्पातील लाभार्थ्यांचे पुनर्वसन रखडले आहे. तसेच मौजा पिपरी (पारगोठान) येथील वंचित प्रकल्पग्रस्त रमेश किसन गेठने यांना पुनर्वसन विभागाकडून कुठलाच मोबदला मिळालेला नाही. त्यांना न्याय देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. कोणतीही परवानगी न घेता हे आंदोलन करण्यात आल्याने आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.