पंकजाचा अखेरचा हल्ला, जानकर युतीतून बाहेर पडणार?
X
सध्या देशातील सर्वात मोठा पक्ष अशी बिरुदावली मिरवणाऱ्या भाजप पासून मित्र पक्ष दूर जाताना दिसत आहे. अकाली दल, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आता महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष भाजप पासून दूर जाताना दिसत आहे. यातील शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि एनडीएतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असलेला महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष हे नक्की कोणावर नाराज आहेत? मोदी की राज्यातील नेतृत्व? याचा विचार करणं करजेचं आहे.
दिवंगत भाजपचे नेते गोपिनाथ मुंडे यांनी भाजपला तळागाळातील लोकांचा पक्ष अशी ओळख निर्माण करुन दिली. यामागे त्यांचा 'माधव' फॉर्म्युला महत्त्वाचा ठरला. माळी, धनगर आणि वंजारी समाजाला एकत्र करत मुंडे यांनी भाजपची मोट बांधली. मात्र, राज्यातील भाजपची सूत्र देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आल्यानंतर हा वर्ग नाराज असल्याचं बोललं जाऊ लागलं. खासकरुन पक्षातील ओबीसी नेत्यांना डावललं गेल्याचं चित्र महाराष्ट्रात निर्माण झालं आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला कंटाळून आपण राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश करत असल्याचं एकनाथ खडसे यांनी सांगितलं. त्यानंतर महादेव जानकर यांनी अचानक स्वतंत्र निवडणूका लढण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, हे सगळं अचानक घडलं का?
नुकतीच पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतरच जानकर यांच्या रासप ने Strategic भूमिका घेत स्वतंत्र निवडणुका लढण्याची घोषणा केली आहे. रासपचे संस्थापक महादेव जानकर कोणताही निर्णय घेताना एरवी पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा करतात. मात्र, हा निर्णय जाहीर करताना त्यांनी पंकजा मुंडे यांच्याशी चर्चा केली नसेल का? जर केली असेल तर पंकजा मुंडे यांनी त्यांना भाजपसोबतच राहा. असं सांगितलं का नाही? इतर ठिकाणी शिष्टाई करणाऱ्या पंकजा यांनी या ठिकाणी शिष्टाई का केली नाही.
त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असलेल्या पंकजा यांनी महादेव जानकर यांना Strategically बाहेर काढले का? असा सवाल उपस्थित होतो. कारण पंकजा यांनी शरद पवार यांची घेतलेली भेट या भेटीनंतर त्यांनी शरद पवार यांची स्तुती करणारं केलेलं ट्विट आणि या ट्विट नंतर महादेव जानकर यांच्या पक्षाने स्वतंत्र निवडणूका लढण्याची केलेली घोषणा... हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता... पंकजा मुंडे Strategically पावलं टाकत आहे का? असं म्हणायला वाव आहे.
त्याचबरोबर एकदा आपल्याला शिवाजी पार्क भरवायचं आहे. मी महाराष्ट्रभर दौरा काढणार आहे. कधी स्वप्नातही भाजपाचं सरकार येईल असं वाटत नव्हतं, तेव्हा मुंडे साहेबांनी भाजपाचं काम केलं. मित्रांसोबत बसलेले असताना 'एक दिवस शिवाजी पार्क सभा घेणार. मुंडे साहेबांच्या संघर्ष यात्रेचा समारोप शिवतिर्थावर झाला. आज मी सांगतेय एक दिवस आपला हा मेळावा शिवतीर्थावर घेतल्याशिवाय राहणार नाही," असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली पुढची रणनिती सांगितली.
मात्र, शिवाजी पार्कवरील सभा आणि शिवसेनेचं घट्ट नातं आणि दसऱ्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांचं केलेलं कौतुक पाहता पंकजा मुंडे शिवसेनेच्या दिशेने वाटचाल करत आहेत का? आणि ही वाटचाल करण्यापुर्वी पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना पहिलं पाऊल टाकण्यास सांगितलं आहे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो.
भाजपचे राज्यातील मित्र पक्ष...
शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षाने भाजपची साथ सोडली आहे. आणि आता महादेव जानकर देखील एनडीएतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्या राज्यात भाजपच्या सोबत शिवसंग्राम पक्षाचे विनायक मेटे, रामदास आठवले यांचा रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया, सदाभाऊ खोत यांचा नव्यानं स्थापन झालेला रयत क्रांती संघटना हे पक्ष सध्या भाजप सोबत आहेत. शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि रासप यासारखे जनमानसात मोठी प्रतिमा असलेल्या पक्षांनी भाजपची साथ सोडली आहे.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच मित्र पक्ष नाराज का होतात? याचा विचार भाजपच्या नेत्याला करावाच लागेल. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांच्यासारख्य़ा मास लिडर नेत्या पक्षात जास्त दिवस नाराज राहून चालणार नाही. पक्षा विरोधात ओबीसी नेते आता एकवटताना दिसत आहे. किंबहूना पक्षातील ओबीसी नेते vs देवेंद्र फडणवीस असा संघर्ष सध्या निर्माण होत असताना फडणवीस यांच्या नेतृत्वाबाबत केंद्र विचार करणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.