...तर राज्यात निवडणूका होऊ देणार नाही: रक्षा खडसे
X
राज्यात मराठा आरक्षणावर वातावरण तापलेलं असताना आता ओबीसी आरक्षणावरुन देखील ओबीसी नेत्यांनी ठाकरे सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. खासकरुन भाजपने आता ठाकरे सरकारवर ओबीसी आरक्षणावरुन हल्लाबोल केला आहे. भाजप खासदार रक्षा खडसे यांनी यावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे.
काय म्हटलंय रक्षा खडसे यांनी?
'महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार होते. तेव्हा आम्ही आरक्षण टिकवून ठेवले होते. परंतु महाविकासआघाडी सरकारच्या वेळकाढूपणा मुळे हे आरक्षण रद्द झाले सरकारने आता तरी वेळ काढून चर्चा करून ओबीसींचे आरक्षण वाचवले पाहिजे. भाजप सरकारच्या वेळेस भाजपने कोर्टात आरक्षणासाठी बाजू लावून धरली होती.
त्यामुळे कोर्टाने भाजप सरकारला वेळ दिला होता की, आपण आपल्या जिल्ह्यात ओबीसी समाज किती आहे त्याप्रमाणे तुम्हाला आरक्षण दिले जाईल. परंतु दुर्दैवाने राज्यात सरकार बदलले आणि महाआघाडी सरकार स्थापन झाले आणि या सरकारने कोर्टात ओबीसींच्या आरक्षणाबद्दल संपूर्ण माहिती देऊ शकले नाही म्हणून हे आरक्षण रद्द झाले. हा अन्याय ओबीसी सहन करणार नाही. 15 महिन्याच्या वेळ देऊन सुद्धा महाविकासआघाडी सरकारने प्रयत्न केले नाही. या सरकारमधील काही ओबीसी नेते देखील आंदोलन करत आहेत.
परंतु त्यांना आंदोलनाची गरज नाही. हे निर्णय घेणारे आहेत म्हणून त्यांनी निर्णय घ्यावा. भारतीय जनता पार्टी ची भूमिका आहे की, जोपर्यंत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या निर्णय लागत नाही. जोपर्यंत कोर्ट आरक्षण देत नाही. तोपर्यंत राज्यात निवडणूका होऊ देणार नाही अशी भूमिका खासदार रक्षा खडसे यांनी मांडली.