शरद पवार- अमित शहा भेटीवरुन तर्कवितर्कांना उधान
राज्याच्या राजकारणात सचिन वाझे, परमबीर सिंह लेटर बॉम्ब आणि फोन टॅपिंगचे मुद्दे थंड होत असतानाच अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अहमदाबादमध्ये गुप्त बैठक पार पडल्याची चर्चा सुरु झाली आहे.
X
यावर अमित शहा यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकार परिषदेत पवारांसोबत बैठक झाली का यावर सर्व गोष्टी सार्वजनिक करायच्या नसतात असं म्हणत सूचक प्रतिक्रिया दिली.
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
संसदेचं अधिवेशन गुरुवारी गुंडाळलं गेलं. त्यानंतर शुक्रवार सकाळपर्यंत शरद पवार दिल्लीतच होते. तिथून ते पहिल्यांदा जयपूरला गेले. तिथे जानकीदेवी पब्लिक स्कूलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. आणि नंतर जयपूरहून अहमदाबादला. शुक्रवारी रात्री साडेनऊ ते शनिवारी सकाळी साडेदहापर्यंत शरद पवार अहमदाबादमध्ये होते, अशी माहिती मिळतेय. योगायोग म्हणजे याच दिवशी अमित शहासुद्धा अहमदाबादमध्ये होते. ही भेट गुप्त राहावी यासाठी ती अहमदाबादच्या शांतीग्राम गेस्ट हाऊसमध्ये आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जातंय. पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते. त्यानंतर शांतिग्राममधील गेस्टहाऊसला तिघांची भेट झाली, असा दावा वर्तमानपत्रांनी केला आहे.