नगरपंचायत ELECTION 2022 : रायगडमध्ये राष्ट्रवादी, शिवसेनेची घोडदौड, भाजपला धक्का
X
रायगड : जिल्ह्यातील सहा नगर पंचायतींच्या निकालात 102 जागांपैकी राष्ट्रवादीने सर्वाधिक 38, तर शिवसेनेने 35 जागा जिंकल्या आहेय यात तळा आणि म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीने बहुमत मिळवले, तर शिवसेनेने पोलादपूर नगर पंचायतीवर एकहाती सत्ता मिळवली आहे. या दोन प्रमुख पक्षांमधील चढाओढ इतर नगर पंचायतीमध्ये सत्ता स्थापनेपर्यंत कायम राहणार आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर होणाऱ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष होणार हे स्पष्ट होईल. बुधवारी आलेल्या निकालांमध्ये रायगडात कही खुशी कही गम असे चित्र दिसून आले.
सहा नगरपंचायतीच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, उद्योगमंत्री सुभाष देसाई, माजी पालकमंत्री रविन्द्र चव्हाण,आमदार महेंद्र दलवी, आमदार भरत गोगावले, माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी जोरदार प्रचार केला होता.
दरम्यान, या निवडणुकीत भाजपाने मोठी हवा निर्माण केली होती; मात्र, भाजपाला नगरपंचायतीच्या मतदारांनी नाकारल्याचे निकालावरून दिसत आहे. तर शेतकरी कामगार पक्षाने आपली सदस्य संख्या कायम राखण्याचा प्रयत्न केला. तळा, म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादी, तर पोलादपूरमध्ये शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले आहे, तर खालापूर, माणगाव, पाली नगर पंचायतीमध्ये दोन किंवा दोनापेक्षा जास्त राजकीय पक्षांना एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी लागणार आहे. पाली नगरपंचायत निवडणुकीत शेकाप राष्ट्रवादी आघाडीला 10 जागांवर यश आले. भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा यांच्या पत्नी व मुलगी यांचा पराभव झाला. मात्र दोन जागांवर पालीत विजय मिळवण्यात भाजपला यश आले. राष्ट्रवादीच्या रायगड जिल्हाध्यक्ष गीता पालरेचा यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती, या निवडणुकीत त्यांचा विजय झाला. खालापूर, माणगाव, पाली या तीन नगर पचायतींमध्ये कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. माणगाव नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेला या नगरपंचायती मध्ये 7 जागा मिळाल्या आहे, त्यामुळे येथे शिवसेना शेकाप ( 1 ) आणि अपक्ष ( 2 ) यांना जवळ करून सत्ता स्थापनेचे गणित जुळवित आहे. या नगरपंचायत निवडणुकीत खासदार सुनिल तटकरे याना धक्का बसला आहे, शिवसेनेने माणगावमध्ये खालापूर मध्येही शिवसेनेला ( 8 ) सत्ता स्थापन करण्याची सधी आहे. मात्र, या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाने (7) जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी (2) ला बरोबर घेऊन शेकापला देखील सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. भाजपाने पोलादपूर आणि नव्याने स्थापन झालेल्या पाली नगरपंचायती मध्ये निराशाजनक कामगिरी केली आहे. या दोन्ही नगरपंचायतीवर बहुमताने सत्ता येईल असा दावा केला होता; परंतु फारसा प्रभाव दाखवता आला नाही. तळा नगर पंचायतीसह भाजपला जिल्ह्यात एकूण 6 जागा जिंकता आल्या.
सहा नगर पंचायतींचा निकाल
1.तळा नगरपंचायत
शिवसेना - 4
भाजपा - 3
राष्ट्रवादी 10
2. माणगाव नगरपंचायत
राष्ट्रवादी- 7
शिवसेना-7
शेकाप -1
इतर-2
3.पोलादपूर नगरपंचायत
शिवसेना-10
भाजपा - 1
काँग्रेस - 6
4.म्हसळा नगरपंचायत
राष्ट्रवादी- 13
शिवसेना-2
काँग्रेस - 2
5.खालापूर नगरपंचायत
राष्ट्रवादी-2
शिवसेना- 8
शेकाप -7
6.पाली नगरपंचायत
राष्ट्रवादी- 6
शिवसेना- 4
शेकाप -4
भाजप- 2
अपक्ष -1