पहिला 'हिंदू' अतिरेकी 'नथुराम' देशभक्त कसा? – डॉ. श्रीपाल सबनीस
पहिला ‘हिंदू' अतिरेकी ‘नथुराम’ देशभक्त कसा? डॉ. श्रीपाल सबनीस यांचा शरद पोंक्षे ला खडा सवाल?
X
भारताच्या मातीतला पहिला हिंदू अतिरेकी नथुराम गोडसे यांने गांधीतला महात्मा गोळ्या घालून ठार केला. तरीही त्याच्या खुनी कर्तृत्वाचा गौरव बेशरमपणे शरद पोंक्षे सारखा कलाकार अनेक वर्ष करीत आहे. 'महात्मा' मारणारा नथुराम देशभक्त कसा? गांधीही हिंदूच तरीही मारेकरी गोडसेचा हिंदुत्ववाद ही मंडळी का कुरवाळतात?
संपूर्ण विश्व महात्मा गांधीच्या अहिंसा प्रेमाने ओतप्रोत असताना मुठभर ब्राह्मणग्रस्त ब्राह्मणाना हिंसावादी नथुरामाचा पुळका का? त्यामुळे संपूर्ण ब्राह्मण जातीची बदनामी झालीय. तुकाराम, बसवेश्वर अशा अनेक मान्यवरांच्या खुनाचे पाप ब्राह्मणांच्या माथी मारले गेले. सर्वच ब्राह्मण जातीवादी नसतात. नाहीत.
तरीही, 'देशाचे दुश्मन' ब्राह्मण जातीस ठरवले गेलंय. तेंव्हा शरद पोंक्षेचे नथुराम प्रेम ब्राह्मणासह देशालाही घातक ठरत आहे. शरद पोंक्षेला नथुरामचे समर्थन करण्याचे घटनात्मक लेखन स्वातंत्र आहे. परंतु त्यांच्या मतानुसार गांधीजींना ठार मारणे चूक असून नथुराम मात्र, देशभक्त आहे. ही दुटप्पी भूमिका आहे.
नथुरामच्या वाक्यांना नाटकाच्या वेळी टाळ्या मिळाल्या म्हणून तो योग्य कसा ठरतो? तो जर देशभक्त असता तर स्वतंत्र भारताच्या न्यायालयाने त्याला फासावर का लटकविले, टाळ्या वाजवणारे मुठभर ब्राह्मण शहाणे आणि गांधीच्या खुन्याला शिक्षा ठोठावणारी न्यायव्यवस्था वेडी आहे का?
पोक्षेंना नथुरामच्या भूमिकेचे अनुभव कथन करण्याचा अधिकार आहेच. तसेच सुबोध भावे, सुनील बर्वे इत्यादी मराठी कलाकारांना याच्या प्रचाराचे स्वातंत्र्यही आहे. मात्र, या प्रवृत्ती व प्रकारामुळे खुनी नथुरामचे उदात्तीकरण रुजत आहे. आणि नथुरामच्या गजरात गांधीच्या महात्म्याची निरपराधी भूमिका पराभूत होत आहे. गांधींची देशभक्ती संशयास्पद ठरवून नथुरामचे अघोरी कृत्य देशभक्तीच्या नावे सर्वांच्या मानगुटीवर बसवणे. महापाप आहे शरद पोंक्षे या पापाने कलंकीत आहे
संविधान, धर्म आणि संस्कृतीच्या सूत्रानुसार खुनीकृत्य गुन्हेगारी ठरते: नथुराम
न्यायालयात व त्याच्या पुस्तकात कोणतेही युक्तीवाद करो तो गुन्हेगार ठरलाय. गांधींचे व नथुरामचे वैचारीक मतभेद जरूर समजून घेता येतील. पण महात्म्याचा खून म्हणजे देशभक्ती कशी? आणि त्याच्या खुन्याचे समर्थन? शरद पोंक्षे स्वत:च्या सुमार अभिनयास स्वत:च गौरवून नथुरामच्या कॅरेक्टरला न्याय देतात. पण माणूस पोंक्षे नथुरामला स्वत:च्या काळजात रूजवून बोलतात – लिहीतात तेव्हा ती वैचारिक व नैतिक भ्रष्टता असते.
त्यामुळे या माणसाचे राष्ट्रीयत्व संशयास्पद आणि मनुष्यत्व कलंकीत बनलंय. अशी नैतिकदृष्ट्या सांस्कृतिक बेईमानी करणारी व्यक्ती अस्सल कलावंत ठरू शकत नाही.
नथुरामच्या सुमारे २० वर्षातील १८०० प्रयोगाच्या ५-७ लाख त्याच-त्याच प्रेक्षकांच्या टाळ्यांचे प्रमाणपत्र मिळवून पोंक्षे स्वतःची पाठ थोपटून घेताना कोटी-कोटी भारतीय विश्वातील जनतेच्या गांधींवरील श्रध्दांना मुठमाती देण्याचे पाप करताहेत.
गांधीही देशभक्त आणि नथुरामही देशभक्त ही दुतोंडी भूमिका विवेकवादी जनतेला मान्य नाही. जगाच्या इतिहासात गांधीतला महात्मा सर्वांना वंदनीयच आहे आणि नथुराम मात्र, गांधीसह मानवतेचा मारेकरीच आहे.