बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्यांनी देश खराब केला का?: संजय राऊत
X
आज सामनाच्या रोखठोक मधून सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना डोनाल्ड ट्रम्प यांना सत्तेचं हस्तांतरण करताना केलेल्या धुडगुसासह मोदी सरकारच्या कारभारावर जोरदार प्रहार केला आहे. बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्य़ांनी देश खराब केला असून मोदी सरकारला दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना भेटायला देखील वेळ नाही असं आजच्या रोखठोक मध्ये म्हटलं आहे.
वाचा काय म्हटलं सामनात...
स्वातंत्र्याचे हवन परकीयांकडूनच होते असे नाही. स्वातंत्र्यासाठी घामही न गाळणारे राज्यकर्ते म्हणून येतात तेव्हा ते स्वातंत्र्यावरच सगळ्यात निर्घृण हल्ला करतात. आजारी कर्मचाऱ्य़ाला भेटण्यासाठी 83 वर्षांचे रतन टाटा मुंबईहून पुण्यास पोहोचले, पण दिल्लीचे राज्यकर्ते शहराच्या सीमेवरील शेतकऱ्य़ांना भेटायला जात नाहीत. बादशहाच्या टोपीला मुजरा करणाऱ्य़ांनी देश खराब केला, दुसरे काय?
सध्या आपल्या देशात नक्की काय सुरू आहे ते ब्रह्मदेवही सांगू शकणार नाही. आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना संसर्गाच्या दहशतीमुळे वर्षभर परदेशात गेले नाहीत. ते हिंदुस्थानातच आहेत, पण हिंदुस्थानातील जनतेचे किती प्रश्न या काळात सुटले? ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन हे कोरोनाचा नवा स्टेन्स घेऊन 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळय़ात अवतरणार होते, पण इंग्रज हे जात्याच शहाणे असल्याने जॉन्सन साहेबांनी आता दिल्लीस येण्यास नकार दिला.
वर्षभरापूर्वी प्रे. ट्रम्प हे अहमदाबादेत 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमासाठी अवतरले तेव्हा 50 लाख लोकांनी स्वागत केले. ट्रम्प व त्यांच्याभोवती असलेल्या अमेरिकन मंडळींनी कोरोनाचा प्रसार केला व निघून गेले. ते प्रे. ट्रम्प आता सत्ता गमावून बसले आहेत. प्रे. ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हरले, पण निवडणुकीच्या विरुद्ध गेलेला निकाल फिरवावा व आपल्यालाच विजयी घोषित करावे यासाठी प्रे. ट्रम्प निवडणूक निर्णय अधिकाऱ्य़ांकडे कसे गयावया करीत होते. याबाबतचा गौप्यस्फोट आता झाला आहे.
प्रे. ट्रम्प यांनी सत्ता टिकविण्यासाठी झुंडशाहीचे शेवटचे टोक गाठले. आपल्या गुंड समर्थकांना त्यांनी अमेरिकेच्या संसदेत घुसवून हिंसाचार केला. त्यात संसदेतच गोळीबार झाला. अमेरिकेच्या इभ्रतीची आणि लोकशाहीची पुरती लक्तरे त्यात निघाली. अमेरिका असेल किंवा हिंदुस्थान, आता लोकशाही ही शोभेचा आणि पोकळ डोलारा म्हणूनच उभी आहे. निवडणूक निकाल फिरवावा म्हणून ट्रम्प यांनी गयावया केली. हिंदुस्थानी लोकशाही पद्धतीत अशी गयावया वगैरे करावी लागत नाही. विरोधात उभे राहणाऱ्य़ांना नष्ट केले की काम भागते आणि निवडणुकांचे निकाल ठरवून घेतले की झाले! लोकशाही या संस्थेवरील लोकांची श्रद्धा आता पूर्ण उडाली आहे!
टाटा मोठे का?
दिल्लीची रया पूर्ण जाताना दिसत आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्य़ांचे सगळय़ात मोठे आंदोलन सुरू असतानाही दिल्लीच्या सत्तावर्तुळात साधी सळसळ जाणवत नाही. वि. वा. शिरवाडकर यांनी काही वर्षांपूर्वी दिल्लीचे वर्णन केले ते आता चपखल बसते-
''मोगलांच्या काय तर अगदी पांडवांच्याही काळात म्हणायला हरकत नाही, दिल्ली ही परिसरासह सतत राजधानी राहिली आहे आणि म्हणून दीर्घकालीन सत्तेमुळे येणारा दुराचाराचा गंज तिच्यावर भरपूर चढला आहे. त्याच कारणाने आसपासच्या प्रांतांतील सरंजामी आणि परंपरानिष्ठ वातावरणही कायम राहिले आहे. या मागासपणाचा आणि भ्रष्टाचाराचा बोजा सर्व हिंदुस्थानवर पडतो आहे. दक्षिणेकडेही आबादी आबाद आहे असं नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास आपणही फारसे निर्मळ आणि प्रगतशील राहिलो असे नाही. मागासल्या समाजात लोकशाही पद्धतीतील राज्यकर्त्यांचे रूपांतर हुकूमशहात होणे असंभवनीय नाही.''
हे शिरवाडकरांनी लिहिले.
आज देशात नक्की कोणती 'शाही' आहे ते कोणीच सांगू शकणार नाही. आपण मागासलेले जरा जास्तच झालेलो आहोत. देशभक्तीची नवी लस सध्याच्या राज्यकर्त्यांनी लोकांना टोचली आहे. त्या लसीचा परिणाम असा की, सध्या आपल्या देशात प्रचाराचा, विकासाचा, विचाराचा मुद्दा म्हणजे देशभक्ती हाच बनला आहे. जणू काही 'देशभक्ती' या शब्दाचा उदय 2014 नंतर झाला. त्याआधी शतकानुशतके देशभक्ती कशाशी खातात? हे हिंदुस्थानवासीयांना माहीत नव्हते. स्वातंत्र्य संग्रामात जे सहभागी झाले व मरण पावले तेसुद्धा सध्याच्या युगात देशभक्त नसावेत.
पंतप्रधान मोदी व भाजपचा जयजयकार करीत आहेत तेच देशभक्त असे आता नक्की करण्यात आले आहे. हिटलर, मुसोलिनी, स्टॅलिन यांच्यावर टीका करणारे व त्यांच्या विरोधात बोलणारेही एकतर देशभक्त नव्हते अथवा ते क्रांतीचे म्हणजे देशाचे शत्रू ठरवले गेले.
पंजाबच्या सीमेवर शेतकरी थंडी-वाऱ्य़ात कुडकुडत उभा आहे. या आंदोलनात 57 शेतकरी मरण पावले. त्यांच्याविषयी संवेदनेचा एकही चकार शब्द न काढणाऱ्य़ांचे सरकार दिल्लीत आहे. असे माणुसकी नसलेले सरकार कोणत्या 'शाही'त बसते? टाटांसारखे लोक मोठे का? हे अशा वेळी समजते.
आपला एक माजी कर्मचारी आजारी आहे हे समजताच रतन टाटा हे मुंबईतून प्रवास करीत पुण्यात गेले. त्या कर्मचाऱ्य़ाला त्याच्या छोटय़ा घरात जाऊन भेटले. त्याच्या कुटुंबास धीर दिला. प्रत्येक पिढीतले 'टाटा' हे भारतरत्न का झाले व अंबानी-अदानी यांना 'टाटां'ची प्रतिष्ठा का मिळू शकली नाही? त्याचे उत्तर टाटांच्या या जीवनशैलीत आहे. हे टाटादेखील सध्या मोदी नीतीचे समर्थक आहेत.
लोकसभा आहे काय?
आज देश व राजकारण एका व्यक्तीभोवती फिरत आहे. लोकसभेचे तरी सार्वभौमत्व उरले आहे काय? लोकसभेच्या सार्वभौमत्वाची जागा पंतप्रधानांच्या सार्वभौमत्वाने घेतली आहे. गेल्या काही वर्षांत एकामागून एक घटनादुरुस्त्या मंजूर करण्यात आल्या, पण दिल्लीच्या सीमेवर 45 दिवस मरत असलेल्या पंजाबच्या शेतकऱ्य़ांसाठी कायद्यात दुरुस्ती करायला सरकार तयार नाही. कृषी कायदे मागे घ्या ही शेतकऱ्य़ांची प्रमुख मागणी असेलही, पण त्यावर लोकसभेत चर्चा तरी होऊ द्या! सध्या काय सुरू आहे त्याची तुलना आणीबाणीशीच करता येईल.
1) कंगना राणावत व अर्णब गोस्वामी यांच्यासारख्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने जणू विशेष न्यायव्यवस्थाच उभी केली. पंजाबच्या शेतकऱ्य़ांचा आक्रोश 40 दिवस झाले तरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला नाही.
2) 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीआधी विरोधी पक्षाला खतम करण्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर त्यासाठी होत आहे.
3) प. बंगालमध्ये खून, हिंसाचार व एकमेकांना संपवून टाकण्याची भाषा केंद्रात सत्ता राबवणाऱ्य़ा पक्षाने करावी हे धक्कादायक आहे. अमेरिकेच्या संसदेत जे निवडणूक निकालानंतर घडले ते सर्व प. बंगाल विधानसभा निवडणुकांच्या निकालाआधी घडत आहे. केंद्राला हे रोखता येणे शक्य आहे. पण लोकशाही रक्ताने भिजली तरी चालेल हे धोरण सगळय़ांचेच आहे.
4) देशाचे भूषण ठरलेले सर्वच सार्वजनिक उपक्रम केंद्र सरकारने विकायला काढले आहेत व एखाद्दुसऱ्य़ा उद्योगपतीलाच ते विकले जात आहेत. देशाची सार्वजनिक संपत्ती अशा प्रकारे खासगी भांडवलदारांची होत आहे व त्यावर बोलणारे देशाचे शत्रू ठरवले जात आहेत. वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर शंभरावर राजेरजवाडय़ांची संस्थाने खालसा केली व देश एकसंध केला. इंदिरा गांधींनी या संस्थानिकांचे तनखेच बंद केले. आता देशात पुन्हा दोन-चार नवे संस्थानिक निर्माण केले जात आहेत.
5) कोरोनाची लसनिर्मिती व त्यावर वैज्ञानिकांनी केलेले संशोधन हा फक्त मोदी यांचाच चमत्कार असा प्रचार सुरू झाला आहे. हा देशातील संशोधकांचा अपमान आहे.
6) हजारो लोकांच्या सायबर फौजा सज्ज केल्या गेल्या आहेत. विरोधकांच्या बदनामी मोहिमा व सत्ताधाऱ्य़ांची टोकाची 'जी हुजुरी' त्याच माध्यमातून सुरू असते. वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांच्या मालकांवर, संपादकांवर अज्ञात दडपण आहे. व्यक्तिस्वातंत्र्य व निःपक्ष पत्रकारिता संपली आहे. हे जे सुरू आहे त्यास हिंदुस्थानची लोकशाही समजायचे काय?
देशात एकप्रकारे भयाण शांतता आहे. अशी अराजकसम स्थिती आणीबाणीतसुद्धा निर्माण झाली नव्हती. न्यायालये, वृत्तपत्रे, संसद, निवडणुका, प्रशासन एक प्रकारे हतबल झाले आहे. या सर्व विषयांचा तटस्थपणे विचार केला की असे वाटते, लोकशाही आपल्या देशामध्ये टिकून राहणे ज्या संस्थांवर अवलंबून आहे. त्या संस्था टिकून राहिल्या पाहिजेत. मुख्य म्हणजे सत्तेत कोणत्याही पक्षाचे सरकार असो, या संस्था टिकून राहणे आवश्यक आहे की नाही? याचा विचार लोकांनी करायला हवा.
परकीयांच्या जोखडातून आपण स्वातंत्र्य मिळवले, पण तेच स्वातंत्र्य अंतिम नसते. स्वराज्यातल्या सत्ताधाऱ्य़ांकडून स्वातंत्र्याचे हवन होतच असते. तेव्हा पुनः पुन्हा नव्या स्वातंत्र्यासाठी झगडावे लागते. हे जगभरात होत आले.
आपला देशही त्यास अपवाद नाही! स्वित्झर्लंडला त्यांचे स्वातंत्र्य झगडून व अत्याचाराविरुद्ध लढा देऊन मिळाले. स्वित्झर्लंडच्या स्वतंत्रता लढय़ातील एक सत्यकथा सांगतो व विषय संपवतो.
स्वित्झर्लंडच्या जनतेचे स्वातंत्र्य चिरडणाऱ्य़ांपैकी एक जुलमी नेता जेसलर हा होता.
जेसलरने एक बादशाही टोपी एका काठीवर घालून ती काठी आपल्या राजधानीतील चौकात उभी करून ठेवली. जो येईल त्याने त्या टोपीला मुजरा केला पाहिजे आणि तसे जो करणार नाही तो देशद्रोही समजला जाईल असा हुकूम जारी केला. हुकूम होताच जे कित्येक लाचार लोक जेसलरपुढे लोटांगण घालीत होते, त्यांना आणखी एक नवीन देवता मिळाली! ते त्या टोपीपुढे रोज लोटांगणे घालू लागले, परंतु विल्यम टेल हा अशा लाचार लोकांपैकी मनुष्य नव्हता. तो स्वाभिमानी व खरा देशभक्त होता. त्याला या गुलामगिरीचा तिटकारा होता. राजाच्या टोपीला मुजरा केला पाहिजे ही गोष्ट जेव्हा त्याला कळली तेव्हा तो गरजला,
''मी ही असली अपमानास्पद गोष्ट कधीच करणार नाही.'' या राजद्रोहाची बातमी जेसलरला समजताच त्याने विल्यम टेलला पकडून आणले. त्याचा छळ सुरू केला. तरीही विल्यमचा स्वाभिमान कायम राहिला. तेव्हा विल्यमच्या मुलाला राजाचे लोक (म्हणजे आताचे ईडी, सीबीआय वगैरे) घेऊन आले. विल्यमला असे सांगितले की, तुझ्या मुलाच्या डोक्यावर एक नारिंगाचे फळ ठेवून त्यावर नेम मार, पण तो नेम चुकला तर मात्र तुझा शिरच्छेद करण्यात येईल. विल्यम टेल हा आपल्या पृथ्वीराज चौहानांसारखा नेमबाजीत कुशल होता, पण थोडा नेम चुकला तर नारिंगाला लागणारा बाण मुलाच्या मस्तकाला लागून बापाच्या हातून पुत्रहत्या होण्याचा संभव होता.
एखाद्या तिरंदाजाने बाण मारला तर तो एकतर चुकेल तरी किंवा बरोबर तरी लागेल, पण या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवून जेसलरने आपल्या दुष्टपणाची तरतूद करून ठेवली होती. नेम बरोबर लागला तर तो बाण मुलाच्या मस्तकाला लागलाच पाहिजे. त्या बाणाने त्याचा प्राण गेला म्हणजे बाप पुत्रशोकाने व्याकूळ होऊन उन्मळून पडेल असे जेसलरचे धोरण होते आणि पुत्रवध नको म्हणून नेम चुकविला तर नेम चुकल्याबद्दल मृत्युदंडाच्या शिक्षेची योजना जेसलरने करून ठेवली होती. सत्तेचा गैरवापर करून, स्वातंत्र्याची गळचेपी करून देशाचा आणि लोकांचा कसा छळ केला जातो त्याचे हे उत्तम उदाहरण.
या कथेची टोपी सगळय़ाच बादशहांच्या डोक्यावर फिट बसते. हिंदुस्थानातही गुलाम लोक बादशहाच्या टोपीला मुजरे झाडतच आले. जगाचे व देशाचे चित्र काही वेगळे नाही. एका विल्यम टेलची गरज आहे!
अमेरिकेतील जनतेने झुंडशाही करणारा बादशहा व त्याच्या टोपीसही उडवले. जगातील लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी हा शुभशकुन आहे.
संजय राऊत