Home > Max Political > शनिवारी एकाच मंचावर येण्याआधी राणे यांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

शनिवारी एकाच मंचावर येण्याआधी राणे यांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

शनिवारी एकाच मंचावर येण्याआधी राणे यांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार
X

नारायण राणे विरुद्ध शिवसेना संघर्षाचा पहिला अंक ताजा असतानाच आता नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे शनिवारी चिपी विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय़ मंत्री नारायण राणे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्याआधी नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर या विमानतळाचे श्रेय घेत असल्याची टीका केली. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही टीका केली.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेत आपले नाव छोट्या फॉन्टमध्ये छापले गेल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्यापेक्षा आपण वयाने आणि प्रोटोकॉलनुसार मोठे आहोत, तरीही आपले नाव खाली आणि छोट्या अक्षरात छापले गेले, अशी खंत राणे यांनी यावेळी व्यक्त केली.

चिपी विमानतळाचं श्रेय आपलं आणि भाजपचे आहे, असा दावा नारायण राणे यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांना पाहुणे म्हणून बोलावलं आहे, त्यांनी पाहुणे म्हणून यावे, पदाप्रमाणं काहीतरी द्या आणि जा, वाटले तर त्यांना म्हावरं खाऊ घालू, असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आपण केला आहे, त्याचे श्रेय कुणी घेऊ नये, असा इशाराही राणे यांनी दिला. शनिवारच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात काही होणार नाही, पण कुणी काही केलं तर सिंधुदुर्गातून बाहेर जाता येत नाही, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.

Updated : 8 Oct 2021 6:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top