महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्यावर नाना पटोले यांचे मोठे विधान
X
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राज्य सरकार अस्थिर झाल्याची चर्चा आहे. यावर नाना पटोले यांनी मोठे विधान केले आहे. नाना पटोले यांनी गेल्या काही दिवसांपासून स्वबळाची भाषा सुरू केली आहे. काँग्रेस येत्या निवडणुका स्वबळावर लढणार अशी घोषणाच त्यांनी केली आहे. तर नुकतेच नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर फोन टॅपिंगचा गंभीर आरोप देखील केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद समोर आले आहेत. तर नाना पटोले यांच्या या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेत्यांकडे स्पष्ट शब्दात नाराजी देखील व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आता नाना पटोले यांनी आपली बाजू मांडली आहे. तसेच काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या स्थैर्याबाबत सुरू झालेल्या चर्चेवरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
वाढती महागाई, इंधन दरवाढ, ओबीसी आरक्षण, नवीन कृषी कायदे यासर्व मुद्द्यांवर गुरूवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली तसेच त्यांना निवेदन दिले. यानंतर झालेल्या पत्रतार परिषदेत नाना पटोले यांनी आपली भूमिका मांडली.
*शरद पवार राज्य सरकारचे रिमोट कंट्रोल*
महाविकास आघाडीतील पक्षांच्या एकमेकांवरील नाराजीमुळे सरकार कधीही कोसळेल असे दावे भाजप नेते करत असल्याच्या प्रश्नावर नाना पटोले यांनी सांगितले की, राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष पूर्ण करणार आहे. तिन्ही पक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. तसेच शरद पवार यांना जसा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तसा मलाही आहे, असे सांगत आपण भूमिकेवर ठाम असल्याचेही त्यांनी संकेत दिले. पण शरद पवार हेच राज्य सरकारचे रिमोट कंट्रोल असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला. महाविकास आघाडी सरकार तयार करण्यात शरद पवारांनी पुढाकार घेतला. आताही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा काँग्रेसचे नेते सरकार संदर्भातील विषयांवर त्यांचे मार्गदर्शन घेत असतात, त्यामुळेच तेच रिमोट कंट्रोल असल्याच्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचेही पटोले यांनी सांगितले.