Home > Max Political > "ठाकरे सरकारच्या षडयंत्राचा पेनड्राईव्ह", देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

"ठाकरे सरकारच्या षडयंत्राचा पेनड्राईव्ह", देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

ठाकरे सरकारच्या षडयंत्राचा पेनड्राईव्ह, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप
X

भाजपचे नेते गिरीश महाजन यांना मोक्का कायद्यांतर्गत अडकवण्यासाठी राज्य सरकारच्या वकिलांच्या मार्फत काही नेते आणि मंत्र्यांनी कट रचला, असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत गंभीर आरोप केले आहेत. तसेच आपल्या आरोपांचे पुरावे म्हणून यासंदर्भातले सुमारे सव्वाशे तासांचे व्हिडिओचा पेन ड्राईव्ह त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवला आहे.

याप्रकरणात राज्य सरकारवर आरोप झाले आहेत, पोलिसांवर आरोप झाले आहेत, त्यामुळे ही चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सरकारने ही चौकशी सीबीआयकडे दिली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, असा इशाराही फडणवीस यांनी दिला आहे.

भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी सरकारी वकील, एसीपी यांच्यामार्फत सरकारने षड्यंत्र रचले होते,असा आरोप करत पोलिसांचा गैरवापर केला गेल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. गिरीश महाजन यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. २०१८मध्ये जळगावमधील मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या दोन गटांच्या वादासंदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यातील भोईटे गटाच्या बाजूने असलेल्या गिरीश महाजन यांचे खास सहकारी रामेश्वर यांनी दुसऱ्या गटाच्या व्यक्तीचे अपहरण करुन पुण्यात डांबून ठेवले. त्यानंतर गिरीश महाजन यांनी फोन आला आणि त्या व्यक्तीला धमकी दिली, अशी बनावट केस तयार करण्यात आल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच महाजन यांच्यावर मोक्का लावण्यासाठी चाकू, रक्त असे सर्वच खोटे पुरावे सादर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

या कटात राज्याचे विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण सूत्रधार होते असा आरोपही फडणवीस यांनी केला. या वकिलांचे ऑफिस आहे की महाविकास आघाडी सरकारचा कत्तलखाना, असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. याच भाषणात त्य़ांना नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणीही पुन्हा केली.

Updated : 8 March 2022 8:22 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top