Home > Max Political > भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उद्ध्वस्त करणार- संजय राऊत

भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उद्ध्वस्त करणार- संजय राऊत

कसबा पोटनिवडणूक ही परिवर्तनाची नांदी आहे. यापुढे महाराष्ट्र जिंकू, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. आणि आगामी काळात भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला असाच उद्धवस्त करु, असा घाणाघात राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी भाजपाला लगावला.

भाजपचा प्रत्येक बालेकिल्ला उद्ध्वस्त करणार- संजय राऊत
X

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा पोटनिवडणुकीत भाजपाला सपाटून मार खावा लागला. आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा अनपेक्षित असा विजय झाला. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला. या विजयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली असून, अनेक राजकीय प्रतिक्रीया उमटू लागल्या आहेत.

ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी या विजयानंतर भाजपावर सडकून टिका केली आहे. कसबा हा भाजपाचा किल्ला आहे असा त्यांचा गैरसमज होता तो आम्ही आज उध्वस्त केल्याची प्रतिक्रिया राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली. कसबा येथील विशिष्ट वर्गाच्या मतांवर आपले एकतर्फी वर्चस्व आहे, असे त्यांना वाटत होते. ते वर्चस्व आज आघाडीच्या उमेदवारांने भूईसपाट केले. कसबा पेठेतील बहुसंख्य मते ही आघाडीच्या उमेदवाराला मिळाल्याचे राऊत यांनी सांगितले. हे लक्षात घ्या, मी परत सांगतो, भाजपासोबत शिवसेना उभी होती, त्यामुळे आतापर्यत त्यांचे बालेकिल्ले भक्कम राहिले होते. आता त्यांचा प्रत्येक बालेकिल्ला याच पद्धतीने उध्वस्त करु, असा थेट इशारा संजय राऊतांनी( Sanjay Raut ) दिला आहे.

कसबा ( Kasba Peth ) पोटनिवडणूक ही राज्यातील परिवर्तनाची नांदी असल्याचे सुतोवाच राऊत यांनी केले. धंगेकर यांचा हा विजय म्हणजे धनशक्तीवर जनशक्तीने केलेली मात आहे. धंगेकर यांच्या विजयाने महाविकास घाडीला बुस्ट मिळाला असल्याचे सुद्धा राऊत यावेळी म्हणाले. भाजपासोबत जोपर्यत ओरिजनल म्हणजे खरी शिवसेना होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव त्यांच्यासोबत होते, तोपर्यत कसबा येथे विजयाची खात्री होती. ज्या क्षणी खऱ्या शिवसेनेची साथ सोडली, तेव्हा खरी शिवसेना महाविकास घाडीच्या बाजूने उभी राहिली. आता त्याची परिणिती रवींद्र धंगेकरांच्या ( Ravindra Dhangekar) विजयाच्या रुपात दिसून येत असल्याचे राऊत म्हणाले.

Updated : 2 March 2023 7:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top