संभाजीराजे घेणार योगी आदित्यनाथ आणि मायावती यांची भेट…
X
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त केंद्र सरकारने देश पातळीवर विविध कार्यक्रम राबवावेत, या संदर्भात खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज राज्यसभेत मुद्दा उपस्थित केला.
या संदर्भात मॅक्स महाराष्ट्र चे दिल्ली प्रतिनिधी शिवाजी काळे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याशी बातचीत केली. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपण देशभरात शाहू महाराजांच्या विचार पोहोचण्यासाठी देशभरात दौरे करणार असल्याचं मॅक्सहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.
याचं दौऱ्यादरम्यान आपण उत्तर प्रदेशला जाऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच बसपाच्या अध्यक्ष मायावती यांची भेट घेणार असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.
राज्यसभेत काय म्हणाले खासदार संभाजीराजे छत्रपती?
"सामाजिक क्रांतीचे प्रणेते असणारे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांचे स्मृतीशताब्दी वर्ष यावर्षी ६ मे पासून सुरू होत आहे. भूतपूर्व कोल्हापूर राज्याचे अधिपती असणारे शाहू छत्रपती महाराज यांनी शोषित व वंचित समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्या राज्यात १९०२ साली आरक्षणाची योजना राबवली. त्यांनीच भारतात सर्वप्रथम बहुजन समजाला शिक्षण व नोकरीमध्ये ५०% आरक्षण दिले. अस्पृश्यता निवारणाचे कायदे करून सामाजिक परिवर्तन घडविणारे ते राजे होते.
राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांनी आपल्या कारकीर्दीत कला, क्रीडा, संस्कृती, उद्योग, शेती, प्रशासन या सर्व क्षेत्रांत परिवर्तन घडवून आणले. संगीत, नाट्य, चित्रकला व मल्लविद्येस त्यांनी विशेषत्वाने प्रोत्साहन दिले. त्यानीच महाराष्ट्रात सहकार चळवळीचा पाया रोवला. उद्योग व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून या क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले. शेतकऱ्यांना स्वतःची व्यापारपेठ उपलब्ध करून दिली. त्यांनी आपल्या राज्यात सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला होता. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिकता यावे, यासाठी अनेक योजना राबविल्या. आपल्या प्रजेला सुशिक्षित करून त्यांना प्रशासकीय निर्णय घेण्यास सक्षम बनवणे व तद्नंतर लोकशाही प्रदान करणे, हे त्यांच्या राज्यशैलीचे मुख्य उद्दिष्ट होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महाराजांनी उच्चशिक्षणासाठी विनाअट मदत केली होती. माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरूवात मी महाराजांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या माणगाव दलित परिषदेतूनच केली, असे डॉ. आंबेडकर म्हणतात. १९२० साली कोल्हापूर राज्यातील माणगाव येथे झालेल्या याच परिषदेत महाराजांनी बहुजनांचे नेतृत्व हे डॉ आंबेडकर करतील व पुढे जाऊन एक वेळ अशी येईल की ते संपूर्ण भारताचे पुढारी होतील, असे सूतोवाच केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाराजांना Pillar of Social Democracy म्हणून संबोधले आहे.
राजर्षी शाहू छत्रपती महाराजांची कारकीर्द ही तत्कालीन प्रजेसाठी तर सुख:प्रद होतीच मात्र त्यांची राज्यपद्धती ही आजदेखील आदर्शवत आहे. एक राज्यकर्ता कसा असावा, प्रशासन कसे चालवावे, याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू छत्रपति महाराज आहेत ! महाराजांच्या राज्याभिषेकाच्या शताब्दीचे औचित्य साधून १९७४ साली भारत सरकारने त्याचे पोस्ट कार्ड प्रकाशित केले होते. लोकशाहीचे सर्वोच्च सभागृह असलेल्या या संसद भवनाच्या प्रांगणात लोकशाहीचा पुरस्कार करणाऱ्या या महान राजाचा पूर्णाकृती पुतळा देखील आहे. मात्र, दुर्दैवाने राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या जीवनाबद्दल आणि कार्याबद्दल फारसे प्रकाशित झाले नाही. लोकांना, विशेषत: भावी पिढीला राजा असूनही हृषीसारखे जीवन जगणाऱ्या या महान व्यक्तीबद्दल जाणून घेण्याची संधी आता आपल्याकडे आहे. म्हणूनच, राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त मी केंद्र शासनाला ६ मे २०२२ पासून संपूर्ण वर्षभर देशव्यापी कार्यक्रम आखण्याची विनंती करतो.
राजा असूनही एका ऋषी प्रमाणे आयुष्य जगलेल्या प्रजाहितवत्सल राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृतीशताब्दी निमित्त भारत सरकारने देश पातळीवर विशेष उपक्रम राबविणे गरजेचे आहे."