Home > Max Political > धर्माच्या नावावर अतिरेकी झुंडशाही व झुंडबळी म्हणजे विकासाला खोडा: सामना

धर्माच्या नावावर अतिरेकी झुंडशाही व झुंडबळी म्हणजे विकासाला खोडा: सामना

सर्व भारतीयांचा डीएनए समान असल्याच्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरून देशभर रान उठले असताना आज सामना संपादकीय मधून या विधानाचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे.

धर्माच्या नावावर अतिरेकी झुंडशाही व झुंडबळी म्हणजे विकासाला खोडा: सामना
X

सर्व हिंदुस्थानींचा 'डीएनए' एकच असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. सरसंघचालकांनी पुढे असेही सांगितले की, हिंदुस्थानात मुस्लिम व्यक्ती राहू शकत नाही असे एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही. त्यावर आता राष्ट्रीय चर्चा व्हायला हरकत नाही. मुळात असे काय घडले की, सरसंघचालकांना मुसलमानांना त्यांच्या 'डीएनए'ची आठवण करून द्यावी लागली. गेल्या पाच-सहा वर्षांत देशाचे वातावरण अतिफाजील, उन्मादी लोकांच्या हाती गेले. निवडणूक राज्याची असो नाहीतर देशाची, दंगली, उन्माद, धार्मिक फाळणी, धर्मद्वेष हाच त्यांचा निवडणुका जिंकण्याचा अजेंडा राहिला. पण हा 'उन्माद' प. बंगालात अजिबात चालला नाही. हिंदुत्वाची आग पेटवूनही प. बंगालातील हिंदू समाजाने भाजपला साथ दिली नाही. बंगाली अस्मितेच्या मुद्दय़ांवर तेथील हिंदू ममता बॅनर्जी यांच्याच मागे ठामपणे उभा राहिला. प. बंगालात दुर्गापूजा, हिंदुत्व खतरे में, ईश्वरचंद्र विद्यासागर विद्यापीठावरील हल्ले असे सर्व घडूनही भाजपला हिंदू-मुसलमानांत विभाजन करून निवडणुका जिंकता आल्या नाहीत. उलट या सर्व उपद्व्यापांमुळे हिंदूंची पीछेहाट झाली. केरळातही भाजपस्टाईल हिंदुत्व लोकांनी स्वीकारले नाही. तेथेही पराभव झाला. उत्तर प्रदेशात वातावरण झपाटय़ाने बदलताना दिसत आहे. लोकांना आता उन्मादाचे, धर्मद्वेषी राजकारण नको आहे. हे सरसंघचालकांनी मान्य केले असले तरी त्यांचे राजकीय अंग असलेल्या भारतीय जनता पक्षाने हे स्वीकारले आहे काय? असा सवाल सामानाने उपस्थित केला आहे.

सरसंघचालकांनी आता देशातील मुसलमान समाजालाच हाक दिली आहे. भागवत म्हणतात, ''हिंदुस्थानात इस्लाम धोक्यात आहे, या भीतीच्या जाळय़ात अडकू नका. कारण धर्म कुठलाही असला, तरी सर्व हिंदुस्थानींचा 'डीएनए' सारखाच आहे. हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष होण्याचे कारण विसंवाद आहे. मुळात हिंदू-मुस्लीम ऐक्य ही संकल्पनाच दिशाभूल करणारी आहे. कारण हिंदू आणि मुसलमान हे एकच आहेत,'' असे सरसंघचालक म्हणतात.

हिंदुस्थानसारख्या लोकशाही देशात हिंदू किंवा मुसलमान कुणाचाही वरचष्मा असू शकत नाही. वरचष्मा असेलच तर तो हिंदुस्थानींचा असेल, असे भागवत म्हणतात; पण सध्याच्या दिल्लीतील सत्ताधाऱयांना हे पटेल काय? गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या नावावर जे झुंडबळी देशभरात गेले, त्यावर सरसंघचालकांनी नाराजी व्यक्त केली. असे झुंडबळी हिंदुत्व संकल्पनेत बसत नाहीत असे ते म्हणतात व राष्ट्रीय ऐक्य हेच देशाला विकासाच्या मार्गाने पुढे घेऊन जाईल, असे स्पष्ट करतात. श्री. भागवत यांनी मांडलेले विचार झटकून टाकता येणार नाहीत. उन्मादी पद्धतीने राज्य चालविणाऱयांचे कान सरसंघचालकांनी टोचले आहेत. एखादी व्यक्ती कोणती प्रार्थना करीत आहे यावरून त्याला वेगळे ठरवता येणार नाही, असेही श्री. भागवत सांगतात. तेव्हा एखादी व्यक्ती काय खाते व पिते यावरूनही त्याला वेगळे ठरवता येणार नाही. गायीला देवता मानणे हा आपला धार्मिक आचार आहेच. त्या गोमांस भक्षणावरून राजकीय वातावरण तापवले गेले. घरात 'बीफ' आढळले म्हणून गेल्या सात वर्षांत अनेकांना झुंडशाहीचे बळी व्हावे लागले. पण जेथे हिंदुत्ववाद्यांची सरकारे आहेत अशा अनेक राज्यांत गायींचे मांस विकले जात आहे व सरकारच्या तिजोरीत त्यातून मोठी कमाई होत आहे. एका बाजूला गोमांस विक्रीवरून, प्रार्थना पद्धतीवरून झुंडबळी आणि दुसरीकडे हिंदुत्ववाद्यांच्या राज्यात गोमांस विक्री हे ढोंग आहे. सरसंघचालकांनी याच विसंगतीवर हल्ला केला आहे. येथील मुसलमान हे बाबराचे किंवा चंगेज खानाचे वंशज नाहीत. त्यांचा 'डीएनए' इथलाच आहे, असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेसुद्धा सांगत होते.

आमचा मक्का मदीना याच मातीत असायला हवा. मक्केत बांग दिली तर येथील धर्मांध मुसलमान जागा होतो. फ्रान्स किंवा इतर देशांत कुठे इस्लाम खतऱयात आला की, येथील धर्मांध मुसलमान 'इस्लाम खतरे में'चे नारे देत रस्त्यावर उतरतात. यामुळे राष्ट्र आणि राष्ट्रीय ऐक्य खतऱ्यात येते. आतापर्यंत काय घडले? या देशातील सरकारचे धोरण व सत्ताधाऱयांची मतांसाठी होणारी लाचारी यामुळेच देशात हिंदू-मुसलमानांचे झगडे किंवा दंगली होत राहिल्या. अर्थात पाकिस्तानवर प्रेम करून कोण राहू पाहत असेल तर त्यांना विरोध होणारच. बांगलादेशी व रोहिंगे मुसलमान आपले कोणी लागत नाहीत. सरसकट सगळे मुसलमान देशद्रोही असे शिवसेनेने कधीच म्हटले नाही. देशप्रेम व राष्ट्रवादाचा आदर्श म्हणून पूर्वी व आताही असंख्य मुसलमानांकडे प्रेरणादायी म्हणून पाहावेच लागेल. पण काही कोपरे पाकिस्तानप्रेमाने अगदी कडवटपणे उभे राहतात आणि तेच झगडय़ांना आमंत्रण देतात.

अयोध्येतील राममंदिराचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने मार्गी लावला व देशातील मुसलमान त्याप्रश्नी संयमानेच वागले. तिहेरी तलाकपद्धती रद्द करण्यावर मुस्लिम समाजातील महिलांनी स्वागत केले. समान नागरी कायदा असेल किंवा लोकसंख्या नियंत्रणाचे धोरण, मुसलमान समाजाने 'हिंदुस्थानी' म्हणून या धोरणांचा स्वीकार केला पाहिजे. मुसलमान हे या देशाचे दुय्यम दर्जाचे नागरिक नाहीत असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी गर्वाने सांगितले. फक्त त्यांनी स्वतःला हिंदुस्थानी मानावे असे भागवत यांचे मागणे आहे. हिंदू हा सहिष्णू, तितकाच विनम्र आहे. त्याने आक्रमणकारी मोगलांचा प्रतिकारही सहनशीलतेनेच केला. मोगल आक्रमक होते म्हणून हिंदूंनी त्यावर तलवार चालवली. शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हे राष्ट्रीयत्वच होते. श्री. भागवत यांनी त्याचाच पुरस्कार केला आहे. धर्माच्या नावावर अतिरेकी झुंडशाही व झुंडबळी म्हणजे विकासाला खोडा आहे. ते थांबवा! सरसंघचालकांना हे विचार मांडावे लागले. त्यामागे काही विशेष संदेश आहे काय? असही सामनाने शेवटी म्हटले आहे.सर्व भारतीयांचा डीएनए समान असल्याच्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरून देशभर रान उठले असताना आज सामना संपादकीय मधून या विधानाचा खरपूस समाचार घेण्यात आला आहे.

Updated : 6 July 2021 7:22 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top